‘पदवी’साठी दररोज ९० किलोमीटरचा प्रवास !
By admin | Published: November 19, 2014 09:36 PM2014-11-19T21:36:34+5:302014-11-19T23:13:34+5:30
गडहिंग्लज पूर्वभागातील विदारकता : वरिष्ठ महाविद्यालयाअभावी विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा
राम मगदूम - गडहिंग्लज
पदवी शिक्षणासाठी गडहिंग्लजच्या पूर्वभागातील विद्यार्थ्यांना दररोज तब्बल ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आहे. स्वातंत्र्याला ७० वर्षे होत आली तरी अजूनही उच्च शिक्षणाची अशी विदारकता असून, मुलींना पदवी-पदव्युत्तर शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
गडहिंग्लज शहरासह तालुक्याच्या दक्षिणेकडील महागाव व नेसरी याठिकाणी पदवी शिक्षणाची सोय आहे. मात्र, पूर्वभागातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या हलकर्णीत वरिष्ठ महाविद्यालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची आभाळ होत आहे. सलग तीन वर्षे मागणी करूनही हलकर्णीच्या वरिष्ठ महाविद्यालयास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
पूर्वभागात नूल, हलकर्णी, तेरणी व हिडदुगी याठिकाणी बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. परंतु, पदवी शिक्षणाची सोय नाही. त्यामुळेच हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळातर्फे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
१९५७ ची स्थापना असणाऱ्या या संस्थेतर्फे हलकर्णी, तेरणी, नरेवाडी व कडलगे या चार माध्यमिक शाळा आणि हलकर्णी व तेरणीत कनिष्ठ महाविद्यालय चालविले जाते. एकूण सुमारे २५०० हजार विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. हलकर्णी भागाचे मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या हलकर्णीत संस्थेची माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला असून, सुसज्ज इमारती व प्रशस्त क्रीडांगणदेखील आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी व भौतिक सुविधा उपलब्ध असल्यामुळेच वरिष्ठ महाविद्यालयाची मागणी केली आहे. स्व. राजकुमार हत्तरकी यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
२३ खेड्यांतील विद्यार्थ्यांची सोय होणार
हलकर्णीत वरिष्ठ महाविद्यालय झाल्यास सुमारे २३ खेड्यांतील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. सध्या त्यांना पदवी शिक्षणासाठी गडहिंग्लजला ये-जा करावे लागते. संबंधित गावापासून हलकर्णी व गडहिंग्लजपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये कंसात : कळविकट्टे १८ (४७), बुगडीकट्टी ९ (२७), तेरणी ६ (२४), हलकर्णी ० (२०), कुंबळहाळ ३ (२०), नंदनवाड ६ (१६), मनवाड ६(१५), नरेवाडी ६ (१४), हिडदुगी ६ (१२), तुप्पूरवाडी ९ (१५), कडाल ९ (१३), मुंगूरवाडी १२ (१९), दुग्गूनवाडी १२ (१९), तेगिनहाळ १४ (२१), बसर्गे ३ (२४), येणेचवंडी ६ (१८), नौकूड ९ (१८), खणदाळ ६ (१८), नांगनूर ९ (२५), कडलगे १२ (२५), इदरगुच्ची ६ (२३), अरळगुंडी १५ (२४), चंदनकुड ३ (२२).
हलकर्णी परिसरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखूनच वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पदवी शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी खास बाब म्हणून बृहत आराखड्यात समावेश करून मंजुरी द्यावी.
- नागेश मुंगूरवाडी, सचिव-हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळ.
‘बृहत आराखड्यात’ नाही म्हणून..
शिवाजी विद्यापीठाच्या
बृहत आराखड्यात हलकर्णीचा समावेश नसल्यामुळेच हलकर्णीतील वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रस्ताव रखडला आहे. परिसराची मूलभूत
शैक्षणिक गरज म्हणून
बृहत आराखड्यात हलकर्णीचा समावेश करावा, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.