विधान परिषदेचे ९० मिनिटे वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:05 AM2018-03-29T05:05:56+5:302018-03-29T05:05:56+5:30
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ९० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील विधान परिषदेच्या कामकाजात मंत्री उपस्थित नसल्यामुळे ९० मिनिटांचा वेळ वाया गेल्याची माहिती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. ४ जुलै रोजी पावसाळी अर्थसंकल्पाला सुरुवात होणार असून त्याचे ठिकाण अद्याप निश्चित नाही.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री नसल्याने वाया गेलेल्या वेळेबाबत सरकारला समज देण्याची मागणी सभापतींकडे केली.
विधान परिषदेचे कामकाज वाढले असून वेळही बदलली आहे. एकाच वेळी दोन्ही सभागृहात कामकाज सुरु असल्याने मंत्र्यांची ओढाताण होत असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.
विधान परिषदेच्या एकूण २२ बैठका झाल्या. त्यात १३१ तास कामकाज झाले. ३ हजार ५८६ तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ३०९ स्वीकृत करण्यात आले आणि १०२ प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली, अशी माहिती सभापतींनी दिली.
१ हजार १९३ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी २४० स्वीकृत करण्यात आल्या आणि ९२ लक्षवेधींवर चर्चा झाली. अर्धा तास चर्चेच्या १९५ सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ११४ स्वीकृत करण्यात आल्या आणि त्यातील ७ वर चर्चा झाली. नियम २६० अन्वये ८ प्रस्ताव आले त्यातील ५ प्रस्तावांवर चर्चा झाली. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली.