९० टक्के बंधारे कोरडेच
By Admin | Published: September 21, 2016 01:50 AM2016-09-21T01:50:01+5:302016-09-21T01:50:01+5:30
शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये लाखो रुपये खर्च करून झालेल्या ‘जलयुक्त शिवारा’च्या कामांमधील जवळपास ९० टक्के बंधारे, के. टी. बंधारे अद्यापही कोरडे
शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये लाखो रुपये खर्च करून झालेल्या ‘जलयुक्त शिवारा’च्या कामांमधील जवळपास ९० टक्के बंधारे, के. टी. बंधारे अद्यापही कोरडे असून, ऐन पावसाळ्यात या भागातील ओढे-नाले कोरडे पडले आहेत.
शिक्रापुरातील काही भाग, पाबळ, धामारी, खैरेनगर, खैरेवाडी, मिडगुलवाडी व परिसरातील वाड्यावस्त्यांवर अद्यापही विहिरींच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. धामारी परिसरात सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून जलयुक्त शिवाराचे काम करण्यात आले. अनेक ओढे, नाले यांचे खोलीकरण करण्यात आले, तर काही भागात के. टी. बंधाऱ्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत झालेल्या सुमार पावसाने अद्यापही हे सर्व बंधारे कोरडे असून, येत्या महिनाभरात पावसाने हजेरी लावली तरच ‘जलयुक्त शिवार’ या योजनेचा फायदा या भागाला होणार आहे.
या भागात झालेल्या जलयुक्त शिवारातील कामांचा अजून तरी काहीही फायदा झाला नाही. शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील काही गावांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अद्यापही धावपळ करावी लागत असून, मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या भागातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम संपूर्णपणे हातून गेला आहे.
(वार्ताहर)
>पाणी नाही
पाबळला काही भागांत थिटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा झाला असला तरी पिंपळवाडी, फुटाणवाडी, थापेवाडी आदी भागांत शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे.ओढे, नाले कोरडे पडले आहेत. खैरेनगर, मिडगुलवाडी, आंदळवाडी आदी भागांतही पुरेल एवढेच पाण्याचे साठे विहिरीत असल्याचे येथील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.