आरक्षणानंतरही 90% तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 07:40 PM2019-01-04T19:40:27+5:302019-01-04T19:44:21+5:30
आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांचं मत
नागपूर: सध्या सर्व जाती-धर्माच्या लोकांकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. मात्र सर्वांना आरक्षण दिल्यावरही 90 टक्के तरुण सरकारीनोकरीपासून वंचित राहतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आयोजित जागतिक मराठी संमेलनात रामदास फुटाणेंनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. त्यात फडणवीस यांनी आरक्षण आणि सरकारी नोकऱ्या यांच्या संदर्भातलं परखड मत मांडलं.
सर्व जातीच्या व्यक्ती सध्या आरक्षण मागत आहेत. मात्र या सर्वांना आरक्षण देऊनही त्यातील 90 टक्के तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत. सरकारी नोकरीबद्दल तरुणांच्या मनात आकर्षण आहे. मात्र सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे, ही बाब तरुणांनी समजून घ्यायला हवी. हळूहळू ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येईल, असं फडणवीस यांनी म्हटलं. सर्वांना आरक्षण मिळालं, तरी सरकारी नोकऱ्या मिळतीलच असं नाही. ही गोष्ट कोणीतरी परखडपणे सांगण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.
सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीवरुन सांगितलं. राज्य सरकारमध्ये दरवर्षी साधारणत: 25 हजार पदांसाठी भरती होते. मात्र आपल्याकडे एकाच तालुक्यातले 25 हजार तरुण सरकारी नोकरीसाठी आस लावून बसलेले असतात. उपलब्ध होणाऱ्या सरकारी नोकऱ्या आणि त्यासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांची संख्या यांचं प्रमाण कधीही जुळणार नाही. त्यामुळे आरक्षण मिळालं की सरकारी नोकरीदेखील मिळेल, असं होण्याची शक्यता अतिशय कमी आहे, असं वास्तववादी मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं.