आदिवासी शाळेतील ९0 विद्यार्थी बेपत्ता!
By admin | Published: November 16, 2016 02:38 AM2016-11-16T02:38:54+5:302016-11-16T02:38:54+5:30
धक्कादायक परिस्थिती; पालकांनीही सोडले गाव.
गणेश मापारी
खामगाव, दि. १५- पाळा येथील आदिवासी प्राथमिक निवासी शाळेमधील तब्बल ९0 विद्यार्थ्यांनी पालकांसह गाव सोडल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. विद्यार्थीनीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्याने, या शाळेमधील विद्यार्थ्यांचे दुसर्या शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला असता, ही बाब उजेडात आली.
खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थीनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात १७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आदिवासी आयुक्तांनी सदर शाळेची मान्यता रद्द केल्यामुळे या शाळेतील ३८८ विद्यार्थ्यांंचे समायोजन करण्याची प्रक्रिया आदिवासी विभागाकडून सुरू आहे. पाळा येथील आश्रमशाळेमध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा आणि जळगाव या पाच जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दिवाळीच्या सुटीनिमित्त सर्व विद्यार्थी आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे आदिवासी विभागाची विविध पथके विद्यार्थ्यांंच्या मूळ गावात जावून त्यांच्या पालकांकडून समायोजन करण्याच्या शाळेबाबत लेखी संमती घेत आहेत; मात्र एकूण ३८८ विद्यार्थ्यांंपैकी ९0 विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी पथकाला आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांंचे पालकसुद्धा गाव सोडून गेले आहेत.
विद्यार्थी आणि पालक मध्य प्रदेशात!
आदिवासी विभागाच्या पथकाला काही विद्यार्थी व त्यांचे पालक मध्य प्रदेशात गेल्याची माहिती मिळाली आहे. शाळेतील नोंदणीनुसार विद्यार्थ्यांंच्या गावाचा शोध घेण्यात आला आहे. संबधीत गावातील सरपंचांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी गाव सोडल्याबाबत या पथकाला लेखी माहिती देखील दिली आहे.
बनावट प्रवेश की आरोपींची भीती?
आदिवासी आश्रमशाळेतील ९0 विद्यार्थी पालकांसह मूळ गावातून गायब होण्याबाबत दोन शक्यता वर्तविण्यात येत आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या भीतीपोटी पालकांनी गाव सोडले, अशी चर्चा काही गावांमध्ये आहे, तर आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांंकडून प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन विद्यार्थ्यांंचा शाळेमध्ये बनावट प्रवेश दाखविला असेल, प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेत येतच नसतील, ही वस्तुस्थितीही समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाळा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांंचे वेगवेगळ्या शाळांमध्ये समायोजन करण्याकरीता सदर विद्यार्थ्यांंच्या मूळगावी पथक पाठविण्यात आले. अनेक गावांमध्ये विद्यार्थी आणि पालक आढळून आले नाहीत. त्यामुळे सरपंचांकडून लेखी माहिती घेण्यात आली आहे.
-व्ही.ए.सोनवणे, आदिवासी प्रकल्प अधिकारी, अकोला.