91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद अखेर बडोद्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 09:10 PM2017-09-18T21:10:50+5:302017-09-18T23:27:15+5:30
91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे.
मुंबई, दि. 18 - 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या यजमानाची घोषणा अखेर झाली आहे. आता बृहृमहाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या गुजरातमधील बडोद्यात 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार आहे. बडोद्याला चौथ्यांदा साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान मिळाला असून, तब्बल 83 वर्षांनंतर प्रथमच बडोद्यात मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद याआधी बुलडाणा जिह्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाला देण्यात आले होते. मात्र शुकदास महाराजांवर अनिंसने केलेल्या आरोपांनंतर हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती.
गुजरातमधील प्रमुख शहर असलेल्या बडोद्यामध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच गायकवाड राजघराण्यामुळे या शहराचे महाराष्ट्राशी अनेक शतकांपासून राजकीय नाते आहे. डोद्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन असणार आहे. यापूर्वी 1909 यावर्षी सातवे संमेलन, 1921 या वर्षी अकरावे संमेलन व 1934 या वर्षी विसावे संमेलन या ठिकाणी घेण्यात आली होती. त्यावेळी अनुक्रमे का. र. कीर्तीकर, न.चिं.केळकर, ना.गो. चापेकर हे बडोद्याच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन झालेले नाही. आता हिवरा आश्रमाने माघार घेतल्याने तब्बल 83 वर्षांनंतर बडोद्याला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे.
हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटीक असावे, असे ज्या अदृश्यशक्तींना वाटते, त्या शक्तींनीच विवेकानंद आश्रम व पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या बदनामीची मोहीम उघडली. त्यामुळे अनेकांची नाराजी झाली आहे. या बदनामीमुळे ९१ वे साहित्य संमेलन विवेकानंद आश्रम येथे घेण्यासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी गेल्या आठवड्यात गुरूवारी स्पष्ट केले होते.
भाषा, साहित्य, संस्कृतीचा प्रचार व प्रसार हाच साहित्य संमेलनाचा पवित्र हेतू आहे, हा हेतूच सफल होऊ शकत नसेल तर आणखी ताणून धरण्यात काय हाशील आहे? त्यामुळे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत, असेही मालपाणी यांनी जाहीर केले.