93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:34 PM2019-07-22T12:34:04+5:302019-07-22T12:34:32+5:30
93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाची माळ अखेर उस्मानाबादच्या गळ्यात पडली आहे.
औरंगाबाद - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाची माळ अखेर उस्मानाबादच्या गळ्यात पडली आहे. साहित्य परिषदेच्या आज औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पुढील साहित्य संमेलानाचे यजमान म्हणून उस्मानाबादच्या नावाची घोषणा करण्यात आली. मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान असलेल्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणांहून दावेदारी करण्यात आली होती. अखेर अरुणा ढेरे यांच्यासह १९ जणांनी दिली एकमताने सहमती देत उस्मानाबादच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, साहित्य संमेलनाची तारीख अद्याप निश्चित नसली तरी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात संंमेलनाचे आयोजन होणार आहे. तसेच संमेलनासाठी अध्यक्षांची निवड आणि अन्य प्रक्रिया आता सुरू होणार आहेत.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी व संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलन व्हावे याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेने मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. यावेळच्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी करण्यात आली होती. पैकी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन मागण्यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून प्राधान्याने विचार करण्यात आला होता. अखेरीस त्यात उस्मानाबादचे पारडे जड ठरले.