आमची भाषणं धारदार झाली तर 'ICE' च्या नोटीस येतात; सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:41 PM2024-01-21T19:41:06+5:302024-01-21T19:41:45+5:30
पुढच्या २-४ दिवसांत महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होईल असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
पुणे - देशात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. जवळपास ९५ टक्के ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस या विरोधी पक्षातील लोकांना दिल्या जातात. सत्ताधारी पक्षातील नाही हा संसदेतील अधिकृत डेटा आहे. त्यामुळे आमची भाषणं धारदार झाली किंवा विरोधात बोललो तर आम्हाला ICE च्या नोटीस येतात असा निशाणा राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर साधला आहे.
रोहित पवारांना ईडीची नोटीस आली आहे त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या कुटुंबाला ईडी,सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस येतात त्या आम्हाला नवीन वाटत नाही. भाजपाकडे आमच्यावर टीका करायला काही राहिले नाही. भ्रष्टाचारमुक्त आणि काँग्रेसमुक्त भारत करू असं भाजपा म्हणायचे. पण काँग्रेसचे किती नेते भाजपात गेलेत याचा आढावा घ्या. त्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेल्या भाजपाने त्यांचे किती नेते त्यांच्या पक्षात अथवा सहकारी पक्षात घेतलेत हे सर्वांनी पाहिले. इंडिया आघाडीच्या ३६ जागा आधीच क्लिअर झाल्या आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच पुढच्या २-४ दिवसांत महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होईल. प्रत्येक राज्यातील जागावाटपाचे धोरण वेगळे असेल. पण महाराष्ट्रात आम्ही एक टीम म्हणून चाललो आहोत. संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. जरांगे पाटलांनी मुंबईला येण्याचा इशारा आधीच दिला होता. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवला असता तर आज सरकारवर हा दिवस आला नसता. राज्याचे सरकार आणि गृह मंत्र्यांनी आंदोलनातून मार्ग काढण्याची तयारी केली असेल बघूया पुढे काय होते असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.
दरम्यान, आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय संवेदनशील आहे. जर सरकारने कुठला कायदा आणला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आमचा नाही. आम्ही विरोधात आहोत. हा सरकारने हाताळायचा विषय आहे. ज्यांच्याकडे २०० आमदार आहेत आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.