विमानांच्या लँडिंगद्वारे ९.६५ कोटींची वसुली
By admin | Published: May 9, 2014 11:51 PM2014-05-09T23:51:22+5:302014-05-09T23:51:22+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाच्या लँडिंगद्वारे १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या काळात मिहान इंडिया लिमिटेडला ९.६५ कोटी प्राप्त झाले.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाच्या लँडिंगद्वारे १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या काळात मिहान इंडिया लिमिटेडला ९.६५ कोटी प्राप्त झाले. याशिवाय पार्किंगद्वारे ८.६५ लाख, पीएसएफद्वारे १३.५८ कोटी आणि जाहिरातीच्या अधिकाराद्वारे १.०८ कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय निवडणुकीच्या काळात विमानतळावर मार्च आणि एप्रिलमध्ये खासगी विमान आणि हेलिकॉप्टरची बरीच ये-जा होती. त्याद्वारे मार्चमध्ये लँडिंगसाठी ६.३७ लाख आणि एप्रिलमध्ये ३.१७ लाख, शिवाय मार्चमध्ये पार्किंग शुल्क ७९.५४ हजार आणि एप्रिलमध्ये १०.८४ हजार, तसेच पीएसएफच्या स्वरूपात मार्च व एप्रिलमध्ये अनुक्रमे २५.४६ हजार व ३०.०१ हजार मिळाले. उपरोक्त माहिती अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत मिहान इंडिया लिमिटेडने दिली आहे. वर्षभरात ११२ हेलिकॉप्टर आणि अन्यच्या ९२ हालचाली झाल्याची विमानतळावर नोंद आहे. शिवाय काँटिनेन्टल एव्हिएशन प्रा.लि.चे विमान विमानतळावर २१ जुलै १९९१ पासून उभे आहे. पार्किंगचे भाडे म्हणून कंपनीकडून किती वसूल केले, या प्रश्नाच्या उत्तरात मिहान इंडियाने सांगितले की, विमानतळ मिहान इंडिया लिमिटेडकडे हस्तांतरित झाल्यापासून १ एप्रिल २००९ ते ३१ आॅक्टोबर २०१३ या काळात १.०५ कोटी रुपये कंपनीकडे बाकी आहे. याशिवाय विमानतळावर येणार्या दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा ठेका खासगी कंपनीला प्रति माह ५.६९ लाख रुपयांत दिल्याचे कंपनीने सांगितले. माहितीच्या अधिकारात एएआय आणि मिहान इंडिया या कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचार्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मिहान इंडियामध्ये कार्यरत एएआयच्या कर्मचार्यांनी मिहान इंडियाकडून पगार घेण्यास नकार दिला आहे. या कर्मचार्यांना एएआय पगार देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
वर्षभरात किती प्राणी आणि पक्ष्यांमुळे धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला, त्यांच्यामुळे किती अपघात झाले आणि किती प्राणी व पक्षी मरण पावले, या प्रश्नाचे उत्तर कोलारकर यांना खरोखरंच अपेक्षित उत्तर मिळाले आहे.
वर्षभरात पक्षी व प्राण्यामुळे अडथळा निर्माण झालेला नाही, शिवाय पक्षी व प्राणी मरण पावले नाही, तसेच विमानाला एकही पक्षी धडकला नाही, असे उत्तर मिळाले. कोलारकर यांनी ही माहिती आयटीआय २००५ कायद्यांतर्गत कंपनीला मागितली होती.