९८ लाखांच्या जुन्या नोटा जप्त; भोईवाड्यात एकाला अटक
By admin | Published: April 1, 2017 04:15 AM2017-04-01T04:15:48+5:302017-04-01T04:15:48+5:30
साकीनाका, घाटकोपरपाठोपाठ भोईवाड्यात १० टक्के कमिशनवर पैसे बदलण्यासाठी आलेल्या शशिकांत तुकाराम कांबळे
मुंबई : साकीनाका, घाटकोपरपाठोपाठ भोईवाड्यात १० टक्के कमिशनवर पैसे बदलण्यासाठी आलेल्या शशिकांत तुकाराम कांबळे याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल ९८ लाख ७५ हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी कारवाई आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एक तरुण पैसे बदली करण्यासाठी भोईवाडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी धनंजय लिगाडे, सहायक पोलीस निरीक्षक मुकेश ढगे आणि गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सापळा रचला. रात्री पावणे नऊच्या सुमारास एका टोयोटा गाडीतून आलेल्या कांबळेला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत तब्बल ९८ लाख ७५ हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही गाडी त्याच्या भावाच्या मालकीची असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
कांबळे हा घाटकोपरचा रहिवासी आहे. त्याचा यापूर्वी दुचाकी विकण्याचा व्यवसाय होता. सध्या तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. विविध ठिकाणांतील पाच ते सहा मित्रांनी त्यांच्याकडील पैसे बदली करण्याचे काम एकाला दिले. त्या व्यक्तीने कांबळेशी संपर्क साधला. हे पैसे बदली करून आणून देण्यासाठी १० टक्के कमिशनचे आमिष दाखविले होते. त्यामुळे कांबळेने तयारी दाखविली आणि भावाच्या गाडीतून तो भोईवाड्यात पोहोचला. मात्र लिगाडे यांच्या पथकाने त्याला वेळीच बेड्या ठोकल्या.
दिंडोशीत ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त
खेरवाडीनंतर आता दिंडोशी परिसरात हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. या नोटा जवळपास ५० लाख रुपयांच्या असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असुन अन्य दोघे
फरार आहेत. हितेश देढिया असे
अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. (प्रतिनिधी)