९८ महापौर, आयुक्तांना निमंत्रण
By admin | Published: June 20, 2016 01:32 AM2016-06-20T01:32:12+5:302016-06-20T01:32:12+5:30
देशभरातून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या ९८ शहरांच्या महापौर व आयुक्तांना शनिवारी (दि. २५) होत असलेल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे
पुणे : देशभरातून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या ९८ शहरांच्या महापौर व आयुक्तांना शनिवारी (दि. २५) होत असलेल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीच्या विविध कार्यक्रमांचा शुभारंभ बालेवाडी येथील सभागृहामध्ये केला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा मोदी यांच्याकडून या कार्यक्रमामध्ये केल्या जाण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी खूपच कमी वेळ मिळाल्याने युद्धपातळीवर कामे सुरू आहेत.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या विविध कामांसाठी १ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च झाला असून त्यापैकी सर्वाधिक खर्च १ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च होर्डिंग, रेडिओ व वृत्तपत्रांमधील जाहिरातींवर झाला आहे. कंपनीच्या आतापर्यंत झालेल्या खर्चाचा हा तपशील मंगळवारी (दि. २१) होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडला जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली. स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्राकडून २८३ कोटी रुपयांचा निधी कंपनीला प्राप्त झाला आहे.(प्रतिनिधी)
पुणे ठरणार स्मार्ट सिटीचे रोल मॉडेल
स्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आलेल्या ९८ शहरांमधून पहिल्या टप्प्यात २० शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहराने दुसरा क्रमांक पटकाविला. योजनेमध्ये नागरिकांचा सर्वाधिक सहभाग मिळविण्याचा मानही पुण्याने पटकाविला आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती येत्या २५ जून रोजी होणार आहे. यानिमित्त योजनेतील महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेचे रोल मॉडेल म्हणून पुण्याकडे पाहिले जाणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीचा आतापर्यंत सर्वाधिक खर्च हा जाहिरातींवर झाला आहे. त्यामध्ये वृत्तपत्रांमधील जाहिरातींसाठी १ कोटी ७३ लाख ५६ हजार रुपये, रेडिओ जाहिरातींसाठी ४ लाख ७९ हजार रुपये, होर्डिंगसाठी ५ लाख २० हजार रुपये खर्च झाला आहे. स्मार्ट सिटीच्या बैठकांच्या चहापानासाठी ३ हजार ९६८ रुपये खर्ची पडले आहेत. विविध प्रकारच्या स्टेशनरी खरेदीसाठी ४४ हजार ४०० रुपयांचा खर्च झाला.
स्मार्ट सिटी अभियानासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या रोड शोसाठी १ लाख २३ हजार ५०० रुपयांचा खर्च झाला आहे. सौरऊर्जा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यासाठी ४ हजार ८५३ रुपयांचा खर्च झाला आहे.