खर्च न दिल्याने ९२ जण अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 02:08 AM2017-04-03T02:08:35+5:302017-04-03T02:08:35+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ७७६ उमेदवारांपैकी तब्बल ९२ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नसल्याची बाब उघडकीस आली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ७७६ उमेदवारांपैकी तब्बल ९२ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या उमेदवारांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली. यंदाची निवडणूक चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार झाली. निवडणुकीसाठी १२८ वॉर्ड आणि ३२ प्रभाग होते. या प्रभागातील जागांकरिता ७७६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रभागपद्धतीने निवडणूक असल्याने आणि प्रभाग मोठ्या प्रमाणावर असल्याने अपक्ष उमेदवारांचे प्रमाण निम्म्याने घटले होते. मिनी आमदारकी एवढे कार्यक्षेत्र एका प्रभागाचे होते. त्यामुळे अधिकृत पक्षाची उमेदवारी न मिळणाऱ्या अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणे टाळले. त्यामुळे निवडणूक रिंगणातील एकूण संख्येवरही परिणाम दिसून आला. निवडणूक लढविलेल्या या सर्व उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीत झालेला खर्च सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. तसेच आॅनलाइन खर्च सादर करण्याचीही सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली होती. (प्रतिनिधी)
सर्वाधिक उमेदवार भोसरीतील
प्रभाग क्रमांक ४, ५ व ७ मधील १९, थेरगावातील २२, २३, २७ या प्रभागांतून १६, तर प्रभाग क्रमांक १, २ आणि ११ मधील ११ उमेदवारांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही. प्रभाग क्रमांक २८, २९, ३० मधील केवळ एका उमेदवाराने निवडणूक खर्च सादर केला नाही.