जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:39 AM2024-06-03T07:39:12+5:302024-06-03T07:41:23+5:30

जून-जुलै महिन्यात ओढ देणार आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला बरसणार

99% rainfall from June to September; Good rain forecast in Konkan, Nashik, East Vidarbha | जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज

जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज

पुणे : राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, नाशिक, चंद्रपूर या भागांत १०० टक्के आणि उर्वरित भागांत साधारणपणे ९५ ते ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. पुण्यात शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले. 

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार
सध्या कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड पडतील, असे हवामान राहणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. जून-जुलै महिन्यात पाऊस ओढ देणार आहे. 

या भागात पडणार खंड ! 
वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठा खंड राहण्याची शक्यता असून, दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. 

दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात
दोन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता, तो आता पुढे सरकला आहे. रविवारी मान्सूनने तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये शिरकाव केला आहे. 
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच राज्यातील विदर्भामधील तापमान किंचित कमी झाले असून, अनेक भागांत पावसाचा अंदाज दिला आहे.
यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला. केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झालेला मान्सून पुढे सरकला नव्हता. रविवारी मान्सूनने मोठी वाटचाल केली आहे. बराच भाग त्याने व्यापला असून, त्याचा पुढील प्रवासही वेगाने होईल.

शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी. कोकणात अधिक पाऊस असल्याने भाताचे उत्पादन चांगले होईल, पण मराठवाड्यात कमी पाऊस असल्याने कमी पाण्यात होणारी पिके लावावीत. कमी पाण्यातही चांगले उत्पन्न देतील, अशा पिकांचे वाण तयार करणे आवश्यक आहे. 
    - डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ 

तुमच्या भागात कसा पाऊस?
विभाग    सरासरी     अंदाज      टक्के
अकोला                 ६८३       ६७१          ९८ 
नागपूर                  ९५८         ९३३           ९७ 
यवतमाळ                ८८२       ८८२           १००
सिंदेवाही (चंद्रपूर)     ११९१        १२२६         १०३ 
परभणी                 ८१५          ७८८          ९७ 
दापोली                 ३३३९        ३५४०        १०६ 
निफाड                 ४३२          ४४६          १०३ 
धुळे                    ४८१           ४५६          ९५ 
जळगाव               ६४०           ६०८           ९५ 
कोल्हापूर             ७०६       ६७४          ९५ 
कराड                  ६५०           ६३०           ९७ 
पाडेगाव               ३६०           ३३२           ९५ 
सोलापूर               ५४३          ५००           ९५ 
राहुरी                  ४०६           ४०३           ९९ 
पुणे                    ५६६           ५६६           १०० 
 

Web Title: 99% rainfall from June to September; Good rain forecast in Konkan, Nashik, East Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.