अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 09:30 PM2018-12-27T21:30:15+5:302018-12-27T21:42:28+5:30
सात इच्छुक संस्थांनी माघार घेतल्यानं नाट्यसंमेलनाचं यजमानपद उपराजधानीला
पुणे : 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाचा मान नागपूरला मिळाला आहे. दि. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन रंगणार आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी प्रस्ताव सादर केलेल्या राज्यातील सात इच्छुक संस्था आणि शाखांनी माघार घेतल्यामुळे लातूर व नागपूर या दोन पैकी कुठल्या स्थळावर शिक्कामोर्तब होणार? याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मायभूमी असलेल्या नागपूर या स्थळाला गुरूवारी हिरवा कंदिल दाखविला.
आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी नागपूर, महाबळेश्वर, चिपळूण, पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा राज्यभरातील इच्छुक संस्था आणि शाखांकडून तब्बल ९ निमंत्रणे आल्याने संमेलनाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र पुढील वर्षीचा निवडणुकीचा हंगाम पाहता सात संस्था आणि शाखांनी प्रस्ताव मागे घेतल्यामुळे केवळ लातूर आणि नागपूर या दोन स्थळांचा विचार होणार आहे. परंतु लातूरमधील दुष्काळाची स्थिती पाहाता ‘नागपूर’लाच संमेलन होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नागपूरवरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाचे वृत्त ’लोकमत’ने दि. 6 डिसेंबर रोजीच प्रसिद्ध केले होते.
संमेलन आयोजनाच्या शर्यतीत असलेल्या लातूरकरांनीच दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता प्रस्ताव मागे घेतल्यामुळे नागपूरकरांना संमेलन आयोजनाचा मान मिळाला असल्याचे समजते. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ही मायभूमी आहे. नागपूरकरांना संमेलनाचा मान मिळाल्यामुळे निवडणुकीच्या हंगामात संमेलनातच राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची संधी चालून आली आहे. यातच मध्यवर्ती नाट्य परिषदेला संमेलनाचा दर्जाही टिकवून ठेवायचा आहे, या दोन्ही गोष्टी या आयोजनातून साध्य होणार असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे, यंदाचे साहित्य आणि नाट्य संमेलन दोन्हीही विदर्भात होत आहे. त्यामुळे साहित्य आणि नाट्य या दोन्हींचा आस्वाद विदर्भवासियांना घेता येणार आहे.