१ वर्षाची दुवा बनणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची ब्रॅण्ड ॲम्बेसडर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:29 PM2024-08-02T15:29:06+5:302024-08-02T15:30:01+5:30

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून गेल्या २ वर्षात ३६ हजाराहून अधिक रुग्णांना मदत, ३०० कोटी वाटप झाल्याची माहिती. 

A 1-year Duva will become the brand ambassador of Chief Minister Medical Aid Fund Room at Maharashtra | १ वर्षाची दुवा बनणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची ब्रॅण्ड ॲम्बेसडर

१ वर्षाची दुवा बनणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची ब्रॅण्ड ॲम्बेसडर

मुंबई - गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष चालवला जातो. या कक्षातून अनेक गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य केले जाते. गेल्या २ वर्षात या कक्षानं ३६,००० पेक्षा अधिक गरीब आणि गरजू रुग्णांना एकूण ३०१ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरीत केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडरपदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आलेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील फहरीण मकुबाई आणि सादिक मकूबाई या मुस्लिम दांपत्याची ही मुलगी आहे. अवघ्या १३ दिवसांची असताना या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे वाचले होते. त्यानंतर सहा महिन्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात या मुस्लीम दांपत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी बाळाला मुख्यमंत्र्यांच्या हातात देत जोडप्याने त्यांच्या बाळाला तुम्ही नाव ठेवावं अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा एकनाथ शिंदेंनी त्या बाळाचं नाव दुवा असं ठेवलं. आता याच मुलीला आगामी काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची ब्रॅण्ड ॲम्बेसडर बनवण्यात आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात सुरू झालेला हा कक्ष मविआ सरकारच्या काळात बंद पडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कक्ष पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची जबाबदारी मंगेश चिवटे यांच्यावर देण्यात आली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. त्याशिवाय या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

'या' आजारांसाठी मिळते अर्थसहाय्य

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यामधून अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी ,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी,  डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया , सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदी आजारांसाठी अर्थसहाय्य मिळते. मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नसून पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून ही मदत मिळवली जाऊ शकते. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

Web Title: A 1-year Duva will become the brand ambassador of Chief Minister Medical Aid Fund Room at Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.