भंगारात सापडलेला ८ लाख किंमतीचा १० तोळे सोन्याचा हार; मजुरानं दाखवला प्रामाणिकपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 09:20 AM2024-09-13T09:20:17+5:302024-09-13T09:20:43+5:30
भंगारात सापडलेला १० तोळ्यांचा हार परत केला; हरितालिकेबरोबर चुकून झाले होते विसर्जन
कऱ्हाड (जि. सातारा) - नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँ फकीर या महिलेला कऱ्हाडातील प्रीतिसंगम घाटावर तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार सापडला. लाखो रुपयांचा हा ऐवज हातात आल्यानंतर कुणाचीही नीतिमत्ता डगमगली असती. मात्र, हातावर पोट असणाऱ्या त्या महिलेने प्रामाणिकपणा जपत सोनाराच्या माध्यमातून तो राणीहार पोलिसांकडे सुपूर्द केला. तसेच पोलिसांनी तो हार मालकाला परत केला.
गोटे (ता. कऱ्हाड) येथील अधिकराव दिनकर पवार हे आपल्या कुटुंबासमवेत ७ सप्टेंबर रोजी हरितालिका मूर्ती विसर्जन करण्यासाठी कऱ्हाडातील प्रीतिसंगम घाटावर आले होते. कृष्णा नदीपात्रात हरितालिका मूर्ती विधिवत विसर्जन करत असताना त्यांच्याकडून चुकून ८ लाख ३० हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहारदेखील नदीपात्रात विसर्जन झाला होता. मात्र ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही.
दहा हजारांचे बक्षीस देऊन नूरजहॉं यांचा गौरव
नूरजहाँ फकीर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना दहा हजार रुपये रोख व यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांना साडी देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांचाही गौरव करण्यात आला.
घबाड पोलिस ठाण्यात केले जमा
दरम्यान, चार दिवसांनी ११ सप्टेंबर रोजी शिवाजी स्टेडियमजवळ राहणाऱ्या नूरजहाँ फकीर या प्रीतिसंगम घाट परिसरात भंगार गोळा करत असताना त्यांना राणीहार दिसला. त्यानंतर नूरजहाँ यांनी तो ओळखीचे सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांच्याकडे आणून दिला.
निसार सय्यद यांनी याची माहिती माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना दिली. त्यानंतर तिघेही कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आले आणि हार जमा केला. पोलिसांनी अधिकराव पवार यांना बोलावून राणीहार त्यांच्याकडे दिला.