Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन; १३ वर्षीय मुलाची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:33 AM2024-06-26T10:33:18+5:302024-06-26T11:26:18+5:30

13-year-old boy from Jalana district was rescued safely in kidnapping case by a phone call from Devendra Fadnavis : जालना जिल्ह्यात फिल्मी स्टाईल पद्धतीने मुलाचे अपहरण करण्यात आले त्यानंतर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. 

A 13-year-old boy from Jalana district was rescued safely in kidnapping case by a phone call from Devendra Fadnavis | Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन; १३ वर्षीय मुलाची सुखरुप सुटका

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन; १३ वर्षीय मुलाची सुखरुप सुटका

जालना - शहरातील १३ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा ११ तासांचा थरार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोनमुळे पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका झाली आहे. शहरातील १३ वर्षीय मुलाचं शाळेत जाताना काही अज्ञातांनी रस्त्यातून अपहरण केले आणि त्यानंतर २ तासांनी अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली. 

नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत शिकणाऱ्या श्रीहरी कृष्णा मुजमुलेचं सकाळी शाळेत जाताना अपहरण झालं. श्रीहरी जिवंत हवा असेल तर ५ कोटी तयार ठेव, पोलिसांना कळवलं तर मुलाचा जीव घेऊ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी कॉल करून मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना दिली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत कृष्णा यांनी आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना फोन करून संबंधित घटना सांगितली. त्यानंतर शेटे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोनवरून हा प्रकार सांगितला. फडणवीसांनीही तात्काळ दखल घेत जालना पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या. 

फडणवीसांच्या फोनमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात पोलीस पथकांनी तपासाला सुरुवात केली. मुलाचे वडील कृष्णा यांना अपहरणकर्त्यांचा फोन येत होता. हा ट्रेस करण्यात आला. ५ कोटी इतकी मोठी रक्कम देणं शक्य नाही, २० लाख देतो असं मुलाच्या वडिलांनी अपहरणकर्त्यांना सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही यंत्रणा आणि फोनद्वारे तपासाची चक्रे फिरवली. रात्रीच्या आठच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम घेऊन मुलाच्या वडिलांना बोलावले. त्याठिकाणी आधीच पोलिसांनी सापळा रचून ठेवला होता. या थरारक ऑपरेशनची भनक जर अपहरणकर्त्यांना लागली असती तर मुलाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.

रात्री ८ च्या सुमारास २० लाख घेऊन सांगितलेल्या ठिकाणी मुलाचे वडील पोहचले. पोलीस या भेटीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. यावेळी २ पथके तयार करण्यात आली. त्यातील एक पथक मुलाच्या सुरक्षेसाठी तर दुसरं पथक अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी होतं. दोन्ही पथकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या होत्या. शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी आरोपींची गाडी आली त्यातून २ आरोपी खाली उतरले त्यांनी मुलाच्या वडिलांकडील पैशांची बॅग घेतली तर तिसरा आरोपी गाडीत श्रीहरीला घेऊन बसला होता. पोलिसांच्या एका पथकाने पैसै घेणाऱ्या २ आरोपींना पकडले तर दुसऱ्या पथकाने गाडीतील तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या अशाप्रकारे श्रीहरीची अपहरणातून सुखरुप सुटका करण्यात आली. 

देवेंद्र फडणवीसांमुळेच वाचले २ मुलांचे जीव, वडील भावूक

योगायोग म्हणजे ज्या मुजमुले कुटुंबातील श्रीहरीचं अपहरण झालं होतं. त्याच्याच लहान बहिणीवर २०१८ मध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २५ लाखांची मदत केली होती. त्यामुळे कृष्णा मुजमुले यांच्या मुलीचे प्राण वाचले होते. फडणवीस यांच्यामुळेच माझ्या दोन्ही मुलांचा जीव वाचला मी हे उपकार कसे फेडू? असं म्हणत मुलांचे वडील भावूक होत शेटे यांचेही आभार मानले. 
 

Web Title: A 13-year-old boy from Jalana district was rescued safely in kidnapping case by a phone call from Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.