PUBG खेळण्याच्या नादात १६ वर्षीय मुलगा इमारतीवरुन खाली कोसळला, पालघरमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:48 PM2022-05-16T16:48:43+5:302022-05-16T16:49:14+5:30
'पबजी' या मोबाइल गेमच्या वेडापायी लहान मुलं कोणत्याही थराला जात असल्याच्या बातम्या आपण याआधीही पाहिल्या आहेत.
'पबजी' या मोबाइल गेमच्या वेडापायी लहान मुलं कोणत्याही थराला जात असल्याच्या बातम्या आपण याआधीही पाहिल्या आहेत. तहान-भूक विसरुन मुलं या गेमच्या नादात तासंतास मोबाइलवर खिळून असतात. या गेमच्या नादात अनेक मुलं घर सोडून निघून गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण आता पबजी गेमच्या नादात एक मुलगा इमारतीवरुन खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शादान शेख असं या १६ वर्षीय मुलाचं नाव असून पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे ही घटना घडली आहे.
पबजी खेळताना खाली पडल्यानं हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. पालघरच्या रिलिफ रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. पालघरमधील शिरगावमध्ये रविवारी ही घटना घडली आहे.
शादान शिरगाव येथील एका निर्माणाधिन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बसून पबजी गेम खेळत होता. तो या खेळात इतका गुंग झाला की आपण बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर आहोत याचाही त्याला विसर पडला. खेळता खेळता तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
'पबजी'साठी मुलानं १० लाख रुपये चोरले!
पबजीच्या वेडापायी एका १६ वर्षीय मुलानं आपल्याच आई-वडिलांच्या अकाऊंटमधून १० लाख रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार याआधी उघडकीस आला होता. ऑनलाइन गेमिंग सेशन्ससाठी त्यानं १० लाख रुपये काढले होते. आई वडिलांना जेव्हा त्यांच्या खात्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम काढली गेल्याचं कळालं तेव्हा त्यांनी पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडीस आला होता.