२१ वर्षाच्या संघर्षाला मनसेमुळे मिळाला न्याय; अनुभव सांगताना आजीचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 01:37 PM2023-04-24T13:37:14+5:302023-04-24T13:38:07+5:30

या महिलेचं नाव पुष्पा अरविंद राठोड असं आहे. त्यांचे वय ७३ आहे. पुष्पा राठोड यांचे पती अरविंद राठोड हे पुणे महापालिकेत कामाला होते

A 73-year-old woman got justice Cause of MNS leader Vasant More, the woman fought with the Pune Municipal Corporation for 21 years | २१ वर्षाच्या संघर्षाला मनसेमुळे मिळाला न्याय; अनुभव सांगताना आजीचे डोळे पाणावले

२१ वर्षाच्या संघर्षाला मनसेमुळे मिळाला न्याय; अनुभव सांगताना आजीचे डोळे पाणावले

googlenewsNext

पुणे - मनसे नेते वसंत मोरे त्यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक समस्यांना वाचा फोडतात. प्रसंगी मनसे स्टाईलने त्यांनी आंदोलने केली आहेत. वसंत मोरे यांच्या या कामामुळे सोशल मीडियात त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यात आता वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेसोबत तब्बल २१ वर्ष संघर्ष करणाऱ्या एका वृद्ध महिलेला न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. 

या महिलेचं नाव पुष्पा अरविंद राठोड असं आहे. त्यांचे वय ७३ आहे. पुष्पा राठोड यांचे पती अरविंद राठोड हे पुणे महापालिकेत कामाला होते. त्यांनी ४० वर्ष महापालिकेची सेवा केली. २००२ मध्ये अरविंद राठोड निवृत्त झाले. त्यानंतर महापालिकेने त्यांची पेन्शन, ग्रॅच्युएटी रक्कम देणे क्रमप्राप्त होते. परंतु त्यांच्या हक्काची पेन्शन मिळावी यासाठी त्यांना महापालिकेसोबत झगडावं लागले. २००२ ते २०१३ या ११ वर्षाच्या काळात स्वत: अरविंद राठोड यांनी महापालिकेविरोधात लढा दिला. हक्काची पेन्शन मिळावी ही त्यांची मागणी होती. २०१३ मध्ये अरविंद राठोड यांचे निधन झाले. मात्र त्यांचा हा लढा पत्नी पुष्पा राठोड यांनी सुरूच ठेवला. 

पुष्पा राठोड यांनी २०१३ ते २०२३ पर्यंत पतीच्या पेन्शनसाठी महापालिकेचे उंबरठे झिजवले. २१ वर्ष राठोड दाम्पत्याने हक्काची पेन्शन मिळावी यासाठी लढत होते. तरीही महापालिकेकडून न्याय मिळत नव्हता. अखेर पुष्पा राठोड यांनी मनसे नेते वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला. मोरे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर वसंत मोरे यांनी पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड केली. आज तुम्ही महापालिका सेवेत आहात, उद्या तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर अशी परिस्थिती आली तर काय कराल? असा जाब वसंत मोरे यांनी महापालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारला. त्यानंतर संबंधित प्रश्न मार्गी लागला. 

वसंत मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे पुष्पा राठोड यांना पुणे महापालिकेकडून १० लाख ३७ हजारांचा चेक देण्यात आला. ही रक्कम निवृत्त कर्मचारी अरविंद राठोड यांच्या हयातीतल म्हणजे २००२ ते २०१३ या कालावधीतील आहे. त्यानंतर २०१३ ते २०२३ या कालावधीतील पत्नी पुष्पा राठोड यांच्या पेन्शनचा चेक जवळपास १० लाखांपर्यंत येईल. ही रक्कम लवकरात लवकर देऊ असं पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राठोड कुटुंबियांच्या २१ वर्षाचा संघर्षाला अखेर मनसेमुळे यश मिळाले आहे. 

वसंत मोरे यांच्याकडे मी माझी समस्या मांडली, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता माझ्या कामाचा पाठपुरावा केला. आज २१ वर्षांनी माझा प्रश्न मार्गी लागला. मनसे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते खूप धावपळ करून लोकांचे प्रश्न सोडवतात असा अनुभव मला इतर पक्षाचा आला नाही अशी भावना पुष्पा राठोड यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: A 73-year-old woman got justice Cause of MNS leader Vasant More, the woman fought with the Pune Municipal Corporation for 21 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.