दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 04:16 PM2024-11-16T16:16:00+5:302024-11-16T16:17:05+5:30
Chalisgaon vidhan sabha 2024: चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे. भाजपकडून मंगेश चव्हाण मैदानात आहेत, तर उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत (UBT) आलेल्या उन्मेष पाटील यांना मैदानात उतरवले आहे.
अजय पाटील
जळगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी हायव्होल्टेज लढत ही चाळीसगाव मतदारसंघात होत असून, या मतदारसंघात कधीकाळी जवळचे मित्र असलेले मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील हे आमने-सामने आले आहेत. भाजपकडून मंगेश चव्हाण तर उद्धव सेनेकडून उन्मेष पाटील हे मैदानात असून, चाळीसगावच्या या आखाड्यात कोणत्या दादांची दादागिरी चालणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
या मतदारसंघात दोन मित्रांमध्ये लढत रंगत असल्याने, दोन्ही ही उमेदवारांना एकमेकांचे कच्चे दुवे व मजबूत बाजू ही चांगल्या पध्दतीने माहिती आहे. त्यामुळे शह- काटशहाच्या राजकारणात सध्या तरी या मतदारसंघात दोन्हीही उमेदवारांचे पारडे सारखेच आहे. मंगेश चव्हाण यांच्यासाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेतली. तर उन्मेष पाटलांसाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे. स्थानिक चाळीसगावच्या मुद्द्यांवर आखाड्यात तापलेल्या कोणता 'पैलवान' बाजी मारणार हे २३ रोजी स्पष्ट होणार आहे.
लोकसभेला काय होते चित्र?
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघात १ लाख ५ हजार २६० मतं मिळाली. तर उद्धव सेनेचे उमेदवार करण पवार यांना ८८ हजार ९३३ मतं मिळाली. या मतदारसंघात भाजपला १६ हजार ३२७ मतांचे मताधिक्य मिळाले होते.