शिर्डीतील एक भिक्षेकरी इस्त्रोचा माजी अधिकारी? धरपकड मोहीम राबविताना पोलीस त्याची कहाणी ऐकून थबकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:52 IST2025-04-04T21:50:45+5:302025-04-04T21:52:01+5:30
Shirdi Isro Begger News: शिर्डीत शुक्रवारी भिक्षेकऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली. त्यात सापडलेल्या एका व्यक्तीने आपण इस्त्रोमध्ये काम केल्याचा दावा केला आहे.

शिर्डीतील एक भिक्षेकरी इस्त्रोचा माजी अधिकारी? धरपकड मोहीम राबविताना पोलीस त्याची कहाणी ऐकून थबकले...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : साईभक्तांना त्रास देणाऱ्या भिक्षेकऱ्यांविरोधात शिर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करत ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या पकडलेल्या भिक्षेकऱ्यांमध्ये एका व्यक्तीने आपण इस्रोमध्ये काम केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना मात्र त्याबाबत काहीही कागदपत्रे आढळली नाहीत. दरम्यान पोलिसांनी त्याची रवानगी भिक्षेकरी गृहात न करता त्याला पुन्हा असे कृत्य न करण्याची समज देऊन सोडून दिले आहे. दरम्यान हा भिक्षेकरी खरेच इस्त्रोमध्ये होता की त्याने हा बनाव केला? याबाबात संभ्रम आहे.
शिर्डीत शुक्रवारी भिक्षेकऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली. त्यात सापडलेल्या एका व्यक्तीने आपण इस्त्रोमध्ये काम केल्याचा दावा केला आहे. त्याने आपले नाव नारायणन आहे, असे सांगितले. आपण २००८ मध्ये मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली आहे. पत्नीचे निधन झाले आहे. भावाने बारा लाख रुपयांना फसवले आहे. मुलगा दुबईत नोकरीला आहे. देशभरातील धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची आवड आहे. २८ मार्च रोजी शिर्डीत साई दर्शनासाठी येण्यापूर्वी नाशिकमध्ये आपली बॅग चोरीला गेली. त्यात २० हजार रुपये व ओळखपत्र होते, असे त्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान सदरचा व्यक्ती इस्त्रोमध्ये काम करत होता, या त्याच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.
इस्त्रोमध्ये काम केल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे, पोलिसांनी त्याला भिक्षेकरी गृहात न पाठवता, पुन्हा असे कृत्य न करण्याची समज देऊन सोडून दिले आहे.
- रणजीत गलांडे, पोलिस निरीक्षक, शिर्डी
५० भिक्षेकऱ्यांना घेतले ताब्यात
शुक्रवारी झालेल्या कारवाईत पोलिसांनी एकूण ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. हे भिकारी ४ राज्ये आणि १२ जिल्ह्यांतील आहेत. या भिकाऱ्यांमुळे साईभक्तांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. त्यामुळे, पोलिस प्रशासन, शिर्डी नगर परिषद आणि साई संस्थान यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कोर्टाच्या आदेशाने या भिकाऱ्यांची रवानगी विसापूर येथील बेगर होम येथे करण्यात आली आहे. यापूर्वी २० फेब्रुवारी रोजी शिर्डीत ५ राज्यांतील व १६ जिल्ह्यांतील ७२ भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बेगर हाऊस येथे करण्यात आली होती. त्यात मुंबईतील एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश होता.