एकीकडे चिता अन् दुसरीकडे विवाह; बहिणीच्या लग्नाला आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 04:42 PM2022-04-09T16:42:39+5:302022-04-09T16:42:53+5:30

डॉ. सोनल यांनी बहीण पायलला साडीचोळीचा आहेर दिला. नंतर काही क्षणातच डाॅ. सोनल यांच्या हृदयात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या.

A brother who came to his sister's wedding died of a heart attack | एकीकडे चिता अन् दुसरीकडे विवाह; बहिणीच्या लग्नाला आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू

एकीकडे चिता अन् दुसरीकडे विवाह; बहिणीच्या लग्नाला आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू

Next

पार्डी-निंबी : पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथे चुलत बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या भावावर काळाने घाला घातला. ऐन हळदीच्या कार्यक्रमात त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तरुण भावाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यामुळे क्षणार्धात आनंदावर विरजण पडले.

डाॅ. सोनल अशोक जयस्वाल (वय ३६) असे मृत चुलत भावाचे नाव आहे. पुसदलगतच्या श्रीरामपूर येथील पायल मुन्ना जयस्वाल आणि यवतमाळ येथील शुभम जयस्वाल यांचे गुरुवार, ७ एप्रिल रोजी लग्न होते. डॉ. सोनल हे पायलचे चुलत भाऊ आहेत. ते कोल्हापूर येथे एका विमा कंपनीत व्यवस्थापक होते. चुलत बहिणीच्या लग्नासाठी ते कोल्हापूरवरून कुटुंबासह आपल्या गावी आले होते. ते कुटुंबीयांसह अगदी आनंदात होते. बुधवारी हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या क्षणी सर्वजण आनंदात होते. डॉ. सोनल यांनी बहीण पायलला साडीचोळीचा आहेर दिला. नंतर काही क्षणातच डाॅ. सोनल यांच्या हृदयात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांना तत्काळ पुसद येथील डाॅ. मनीष पाठक यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. त्यामुळे लग्नाचा आनंद काही क्षणातच दु:खात परावर्तित झाला. डाॅ. सोनल हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. २०१० मध्ये त्यांच्या वडिलांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई अन्नपूर्णा, पत्नी स्विटी, पाच महिन्यांचा चिमुकला मुलगा, अविवाहीत बहीण करिश्मा, विवाहित बहिणी प्रीती रवींद्र जयस्वाल आणि दीपाली विक्रम जयस्वाल, काका मुन्ना जयस्वाल असा आप्त परिवार आहे.

एकीकडे चिता अन् दुसरीकडे विवाह

बुधवारी सायंकाळी निधन झाल्यानंतर डॉ. सोनल जयस्वाल यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी पुसद येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे त्याच दिवशी सायंकाळी त्यांची चुलत बहीण पायल मुन्ना जयस्वाल आणि यवतमाळ येथील शुभम जयस्वाल यांचा अत्यंत दु:खद वातावरणात विवाह पार पडला. डॉ. सोनल यांच्या मृत्यूमुळे या विवाहातील सर्व आनंदावर विरजण पडले होते. आप्त स्वकियांनी अत्यंत साधेपणाने विवाह पार पाडला.

 

Read in English

Web Title: A brother who came to his sister's wedding died of a heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.