परतीच्या पावसाचा तडाखा; पिके पाण्यात; पश्चिम महाराष्ट्रासह, खान्देश, सातपुडा परिसरात मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:18 AM2022-10-12T06:18:57+5:302022-10-12T06:19:06+5:30
वीज पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरुण तर बुलडाणा जिल्ह्यात एक शेतकरी मृत्युमुखी पडला असून, धुळे जिल्ह्यात दोन महिला जखमी झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, अकोला : परतीच्या पावसाचा कहर सुरूच असून मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील अकोला जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
वीज पडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तरुण तर बुलडाणा जिल्ह्यात एक शेतकरी मृत्युमुखी पडला असून, धुळे जिल्ह्यात दोन महिला जखमी झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याला गेले दोन दिवस पाऊस झोडपून काढत आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने काढणीस आलेली भात, भुईमूग, सोयाबीन पिके धोक्यात आली आहेत. हातकणंगले, शिरोळ, करवीर, गगनबावडा तालुक्यात व इचलकरंजी परिसरात धुवाधार पाऊस झाला आहे.
सातपुडा भागात ढगफुटी
अकोला : अकोट,तेल्हारा तालुक्याला पावसाचा तडाखा बसला असून खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. सातपुडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने बोर्डी, कासोद, शिवपूर, शहापूर, हिवरखेड, पिंप्री उमरा, मक्रमपूर आदी गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
विजेचा लोळ पडून युवकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. पहाटे अंगावर विजेचा लोळ कोसळल्यामुळे हनुमंत नाना झोरे (२९, रा.सांगेली-गुरगुटवाडी) हा युवक जागीच ठार झाला. तो लघुशंकेसाठी घराच्या बाहेर गेला असता, ही घटना घडली.
धानपीक भुईसपाट
गोंदिया जिल्ह्यात सोमवारपासून संततधार कायम असून, धानपिकांना फटका बसला आहे. सध्या हलक्या धानाची कापणी सुरू आहे. परंतु पावसामुळे धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने ते पाखड होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात सर्वदूर
बीडसह शिरूर, गेवराई, धारूर, माजलगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मंजरसुंबा परिसरात अतिवृष्टी झाली.