मोदींच्या दौऱ्यात गोंधळाचे प्रकरण; पीएफआयविरोधात छापे; मुंबई-ठाण्यासह देशभरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 06:32 AM2023-10-12T06:32:06+5:302023-10-12T06:34:48+5:30
अब्दुल वाहिद शेख हा विक्रोळी येथील पार्कसाइट परिसरातील एका चाळीत राहतो. छापे टाकण्यासाठी एनआयएचे अधिकारी व पोलिस यांचे संयुक्त पथक पहाटे पाच वाजता त्याच्या घरी पोहोचले.
मुंबई/नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षी बिहार दौऱ्यात गोंधळ घालण्याचा गुन्हेगारी कट रचल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) सदस्यांविरुद्ध सहा राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एनआयएच्या पथकाने महाराष्ट्रातील मुंबईतील विक्रोळी भागातील अब्दुल वाहिद शेख याच्या घरावरही छापा टाकला. ठाण्याच्या राबोडीतील शाहीद नेरकर या सिमीच्या माजी सदस्यावरही अधिकाऱ्यांनी छापे टाकले. त्याला २००३ मध्ये एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनआयएच्या मुंबई आणि लखनऊ येथील अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली असून त्यातून लॅपटॉप, कॉम्प्युटर तसेच काही डिजिटल पुरावे मिळाल्याचा दावा एनआयएने केला, तसेच साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांना सहा तास ताटकळवले
- अब्दुल वाहिद शेख हा विक्रोळी येथील पार्कसाइट परिसरातील एका चाळीत राहतो. छापे टाकण्यासाठी एनआयएचे अधिकारी व पोलिस यांचे संयुक्त पथक पहाटे पाच वाजता त्याच्या घरी पोहोचले.
- मात्र, त्याने सहा तास घराचा दरवाजाच उघडला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. त्याने अधिकाऱ्यांकडे वॉरंट आहे का, अशी विचारणाही केली.
कुठे टाकले छापे?
महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्लीसह इतर राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले. राजस्थानमधील टोंक, कोटा, गंगापूर आणि नवी दिल्लीतील हौज काझी, बल्लीमारन येथेही छापे टाकण्यात आले.
संशयित वृद्धाची ७ तास चौकशी
मध्य प्रदेशातील भोपाळच्या खानू गावात एनआयएने बुधवारी सकाळी छापा टाकून एका वृद्धाला ताब्यात घेतले. पीएफआयसोबत असलेल्या त्याच्या संपर्कातून तपास यंत्रणेला इनपूट मिळाले आहेत.
दहशतवादी लखबीर सिंगची जमीन हाेणार जप्त
मोहाली येथील एनआयए कोर्टाने पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील कुख्यात दहशतवादी आणि खलिस्तान लिबरेशन फ्रंटचा पाकस्थित स्वयंघोषित प्रमुख लखबीर सिंग ऊर्फ रोडे याच्या मालकीची जमीन जप्त करण्याचे आदेश दिले.