वाहन बेदरकार चालवाल तर होणार गुन्हा दाखल, हिमाचल पॅटर्न आता महाराष्ट्रातही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 01:30 PM2023-05-16T13:30:03+5:302023-05-16T13:31:09+5:30
हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
मुंबई : विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद लवकरच कायद्यात केली जाईल. त्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पोलिस महासंचालक रजनीश सेठ, अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) रवींद्र सिंघल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यावरील अपघात रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
अतिवेगाने घेतले ९८२९ बळी
बेदरकारपणे तसेच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे २०२१ मध्ये २० हजार ८६० अपघातांत ९८२९ प्रवाशांचा मृत्यू झाला.