प्राथमिकच्या वेळेत बदलामुळे अडचणी वाढणार; माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 07:06 AM2024-02-27T07:06:53+5:302024-02-27T07:07:04+5:30
राज्यात दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेची वेळ बदलली तर माध्यमिकचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.
- प्रशांत बिडवे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील शाळांमधील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजेनंतर भरवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ विद्यार्थ्यांची झोप पूर्ण व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच स्कूल बसचालक यांच्यासमोरील अडचणींत वाढ होणार आहे.
राज्यात दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेची वेळ बदलली तर माध्यमिकचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. शाळांतील वर्गखोल्यांअभावी मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचा प्रश्न निर्माण होईल; तसेच माध्यमिक शाळा उशिरा सुटल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यभरात इंग्रजी माध्यमांसह मोठ्या संख्येने शाळा दोन सत्रांत चालतात. त्यात प्राथमिक वर्गाची शाळा सकाळी ९ ते २ या कालावधीत भरवल्यास त्यापुढे माध्यमिक शाळांचे वर्ग केव्हा भरविणार? असा सवाल माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे.
माध्यमिक वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान उभे राहील. त्यामुळे शाळेची वेळ वाढवावी लागेल आणि त्यानंतर मुला-मुलीना घरी परतण्यास एक ते दीड तासांचा वेळ लागू शकतो. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.
- सतीश इनामदार, अध्यक्ष, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ
ज्या भागात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविणे अशक्य असेल तेथे स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने शाळांच्या वेळेबाबत लवचिकता ठेवणे, तसेच निर्णय घेण्याची मुभा शासन निर्णयात देण्यात आली आहे.
- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त