कात व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:06 PM2023-08-03T22:06:21+5:302023-08-03T22:06:48+5:30
खैर वृक्ष लागवडीबाबत प्रोत्साहन देता येईल का, याचाही अभ्यास होणार
Maharashtra Monsoon Session: कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील कात उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून या विषयावर विविध पैलूंचा अभ्यास करून या संदर्भात मार्ग सुचविण्याकरीता दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्याचे निर्देश राज्याचे वने आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कात व्यावसायिकांच्या अडचणींबाबत आज सायंकाळी विधानभवनात मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार शेखर निकम, वन विभागाचे प्रधान सचिव व्ही. बी. रेड्डी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव भंडारी यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, कात व्यावसायिकांच्या अडचणींची शासनाला जाणीव आहे. त्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. त्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्यात येईल. या समितीने अभ्यास करून अहवाल सादर करावा. तसेच खैर वृक्ष लागवडीबाबत प्रोत्साहन देता येईल का, याबाबतचाही अभ्यास करण्यात येईल. या अभ्यासाकरता श्री माधव भंडारी यांनी मदत करावी अशी सूचनाही श्री मुनगंटीवार यांनी यावेळी केली. यावेळी कात व्यावसायिकांतर्फे आमदार श्री. गोगावले, श्री. निकम, सामाजिक कार्यकर्ते श्री. भंडारी यांनी विविध सूचना केल्या.