अवघे ३० कर्मचारी बाळगणारी कंपनी करते ‘समृद्धी’वर वाहतूक नियमन
By सुनील काकडे | Published: February 11, 2023 01:45 PM2023-02-11T13:45:54+5:302023-02-11T13:46:57+5:30
नागपूर ते मुंबई ७१० किलोमीटर आठपदरी महामार्गाावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून, अल्पावधीतच अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.
वाशिम : अमानी महामार्ग पोलिस केंद्राकडे जेमतेम २८ कर्मचारी व दोन अधिकारी असे आधीच अपुरे मनुष्यबळ आहे. असे असतानाही त्यांच्याकडेच आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात रोखणे, वाहतूक नियमन आणि कारवायांचीदेखील जबाबदारी देण्यात आली. म्हणायला, यवतमाळचे इंटरसेप्टर वाहन दिमतीला आहे; मात्र पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी ९७ किलोमीटरच्या भव्यदिव्य रस्त्यावर कारवायांची गती मंदावली असून, अपघातांवर नियंत्रण कसे मिळविले जाणार, हा मोठा प्रश्न आहे.
नागपूर ते मुंबई ७१० किलोमीटर आठपदरी महामार्गाावर अपघातांचे प्रमाणही वाढले असून, अल्पावधीतच अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.
जनजागृतीही नाही
समृद्धी महामार्गावर ‘राइट लेन’चा वापर कधी करायला हवा?, ‘हाय-वे हिप्नोसिस’ म्हणजे काय? वेगाचे उल्लंघन केल्यास काय परिणाम होऊ शकतो आदी प्रश्नांची उत्तरे न मिळविताच या महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. वाहतूक नियमन, जनजागृती आणि कारवाई करण्यासाठी महामार्गावर स्वतंत्र यंत्रणेची अद्याप नेमणूक करण्यात आलेली नाही.