गुराखी बनला सरपंच, वर्गणी जमवली, अपक्ष निवडणूक लढवली, सायकलवरून केला प्रचार, अखेर काँग्रेस-भाजपाच्या दिग्गजांना दिला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:43 AM2022-12-21T11:43:11+5:302022-12-21T11:44:58+5:30
Gram panchayat Election Result: महाराष्ट्रातील सुमारे ७ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. चंद्रपूरमधील बल्लारपूर तालुक्यातील बामनी गावामध्ये ग्रामस्थांनी एका गुराख्याला सरपंच म्हणून निवडून दिले आहे.
चंद्रपूर - महाराष्ट्रातील सुमारे ७ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांमध्ये आपलीच सरशी झाल्याचे दावे सर्व पक्षांकडून करण्यात येत आहेत. त्यातच या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत. दरम्यान, चंद्रपूरमधील बल्लारपूर तालुक्यातील बामनी गावामध्ये ग्रामस्थांनी एका गुराख्याला सरपंच म्हणून निवडून दिले आहे.
अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या या उमेदवारासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून निधीही उभारला. तसेच त्याच्या विजयासाठी सायकलवरून प्रचारही केला. अखेर याचं फळ म्हणून गावाने त्यांना सरपंचपदी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. या विजयात तरुणांचे योगदान मोठे आहे. या नवनियुक्त सरपंचांचं नाव आहे प्रल्हाद बुधाजी आलाम. ते ते बामनी गावात राहतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते गावातील लोकांची गुरे चरण्यासाठी घेऊन जातात. त्याशिवाय शेती आणि मोलमजुरी करून ते कुटुंबाचे पालन-पोषण करतात.
प्रल्हाद आलाम यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासमोर भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे आव्हान होते. निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि समर्थकांचे पाठबळ नव्हते. तेव्हा त्यांनी सायकलवरून स्वत:चा प्रचार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी त्यांची थट्टा केली. मात्र आलाम यांनी धीराने निवडणूक लढवली. अशा परिस्थितीत त्यांचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून गावातील तरुण त्यांच्या मदतीस आले.
या तरुणांनी आलम यांच्यासाठी निधी गोळा केला. त्यानंतर प्रल्हाद आलाम यांनी जोमाने प्रचाक केला. त्यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या मातब्बर उमेदवारांना टक्कर देत १०८५ मते मिळवून विजय मिळवला. आता विजयानंतर प्रल्हाद आलाम यांनी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आलाम यांनी सांगितले. तसेच माझ्या विजयात गावातील तरुणांचं महत्त्वाचं योगदान आहे, मी त्यासाठी त्यांचा आभारी राहीन, असे त्यांनी सांगितले.