समाजातील सर्व घटकांचे मत घेऊन जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेतला जाईल- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 02:40 PM2023-12-20T14:40:13+5:302023-12-20T14:45:01+5:30
महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून येथील संस्कृती आणि परंपरा इतर राज्यांपेक्षा वेगळ्या आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
जातनिहाय जनगणनेबाबत देशभरात सतत चर्चा सुरू आहे. विरोधी पक्ष सातत्याने जनगणना करण्याची मागणी करत आहेत. याचदरम्यान, समाजातील सर्व घटकांचे मत घेऊन जातनिहाय जनगणनेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून येथील संस्कृती आणि परंपरा इतर राज्यांपेक्षा वेगळ्या आहेत. महाराष्ट्रात सर्व समाज आणि जाती एकत्र राहतात, एकत्र काम करतात आणि एकत्र सण साजरे करतात. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचे मत जाणून घेतल्यानंतर जनतेच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येथे उपस्थित राहून संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्मारकाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
स्मृती मंदिर परिसर हे एक आमच्यासाठी प्रेरणास्थान आणि स्फूर्तीस्थान आहे. येथे कामाची ऊर्जा मिळते. त्यामुळे येथे नतमस्तक व्हायला आलो. हे सेवा करण्याचे स्थान आहे. त्यामुळे समाजाची सेवा करण्याची प्रेरणा आम्हाला येथून मिळते. मला काय मिळेल? यापेक्षा मी देशासाठी आणि समाजासाठी काय करू शकतो? हा विचार घेऊन आम्ही येथून जात असतो, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरूजी स्मृती मंदिर भेट.#RSS#Nagpur
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 20, 2023
🗓️ 20-12-2023 📍नागपूर pic.twitter.com/EbdGrB16gt
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या अनेक योजना महाविकास आघाडीच्या काळात बंद करण्यात आल्या, त्या विकासाच्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. जनतेला सरकारच्या योजनाचा लाभ व्हावा त्यांच्यामध्ये सुख समृद्धी नांदावी. समाजाच्या शेवटच्या माणसाला सगळ्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही काम करत आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.