ऐन पावसाळ्यात महाराष्ट्रात दुष्काळाची चाहूल? सावित्रीसह काळ नदीने तळ गाठला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:25 AM2022-08-03T11:25:14+5:302022-08-03T11:25:53+5:30
आठवडाभरापासून पावसाची दांडी; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : जुलै महिन्यात धोकादायक वाटणारा पाऊस अचानक गायब झाल्याने तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे. जवळपास आठवडाभरापासून पावसाने दांडी मारल्याने वातावरणात निर्माण झालेल्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर कडक उन्हाने शेतकरीदेखील चिंतित आहेत. कोकणातील भौगोलिक स्थितीनुसार पावसाचे पडणारे पाणी पाऊस थांबताच थेट नदीला जाऊन मिळते. यामुळे बहुतांश नद्या आणि नाले कोरडे पडू लागले आहेत.
महाडसह संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण अधिक आहे. महाड आणि पोलादपूरमध्ये तर पावसाची मुसळधार असते. दोन्ही तालुक्यात सरासरी ३ ते ४ हजार मिमी पावसाची नोंद होते. तालुक्यातील उंच भागात पावसाचे प्रमाण यापेक्षा वेगळे आहे. महाड तालुक्याच्या शेजारी असलेल्या महाबळेश्वरमधील पावसाचे प्रमाण याहून अधिक असल्याने येथील पावसाच्या पाण्याचा प्रभाव महाड आणि पोलादपूरमध्ये जाणवतो. जुलै महिन्यात नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने पडणारा पाऊस कमी होऊन देत नाही. मात्र यावर्षी पावसाने अचानक दांडी मारल्याने महाड तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे.
जून महिन्यात पाऊस उशिराने सुरू झाल्याने आणि जुलै महिन्यातदेखील पावसाने मारलेली दांडी यामुळे शेतकऱ्यांच्या भातलावणीदेखील लांबणीवर गेली. शेतकरी भाताची रोपे करपतात की काय, या भीतीने चिंतेत सापडले आहेत. नद्यांनी तळ गाठल्याने दुष्काळाची चाहूल करून दिली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाड तालुक्यातून सावित्री, गांधारी आणि काळ या नद्या ऐन पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. मात्र पाऊस कमी होताच तत्काळ तळ गाठतात.
जूनमध्ये महाड तालुक्यात अवघा
२९९ मिमी पावसाची नोंद झाली. तर जुलै महिना संपल्यानंतर अवघ्या १६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यातील कोथुर्डे, आंबिवली, कुर्ले, धरणातील पाणीसाठा पाऊस थांबताच कमी झाला आहे. ओसंडून वाहणारी धरणे आता मंदावली आहेत. ग्रामीण भागातील नद्यानाल्यांची पातळी कमी झाली असल्याने आणि पावसाचे प्रमाण असेच राहिले तर पिण्याच्या पाण्याचे स्रोत लवकरच आटून जातील अशी भीती वर्तवली जात आहे. कोकणात भातपिकाला लागणारा पाऊस, पिण्याचे पाण्याचे स्रोत मे महिन्यापर्यंत टिकायचे असतील तर पावसाचे प्रमाणातील सातत्य कायम राहणे गरजेचे आहे.
पावसाची आकडेवारी
महाड तालुक्यात २००५ मध्ये एकूण पावसाची नोंद ४२२३ मिमी, तर २००७ मध्ये ५८९९ मिमी, २०१९ मध्ये ४३९६ मिमी, २०२० मध्ये ३४४८ मिमी, २०२१ मध्ये ३४२० मिमी पाऊस झाला आहे. गेला आठवडाभर महाड तालुक्यात २० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.