भविष्यात आणखी काही लोक ठाकरे गट सोडण्याच्या तयारीत; गिरीश महाजन यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 05:24 PM2023-06-18T17:24:21+5:302023-06-18T17:25:02+5:30
मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. मात्र त्याआधी ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहे. काल शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. आज विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मनीषा कायंदे ह्या गेल्या काही काळापासून ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, आज सकाळपासून मनीषा कायंदे ह्या नॉट रिचेबल आहेत. मनीषा कायंदे ह्या आता शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मनीषा कायंदे ह्या ठाकरे गटाने आयोजित केलेल्या शिबिराला अनुस्थितीत आहेत. त्यामुळे वर्धापनदिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना झटक्यावर झटके बसत आहेत. भविष्यात आणखी काही लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे सकाळच्या भोंग्याशिवाय आता काहीही राहिले नाही. अगदी वर्धापन दिन असतानाही उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार सोडून जात आहेत, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
कोण आहेत मनीषा कायंदे?
मनीषा कायंदे ठाकरे गटाकडून विधानपरिषदेच्या आमदार आहेत. त्यांनी भाजपाकडून २००९ ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या. त्यानंतर २०१२ साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१८ साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती.