वन्यप्राण्यांसाठी शेतात लावत होते झटका मशीन; अचानक विजेच्या धक्क्याने चौघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 10:20 AM2024-09-12T10:20:06+5:302024-09-12T10:20:20+5:30
शेतात प्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी झटका मशिन लावताना घात
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर ) : वन्यप्राणी शेतात येऊ नये म्हणून सभोवताल झटका मशीनचे तार लावण्याचे काम सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागून चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकजण जखमी झाला. गणेशपूर (ता. ब्रह्मपुरी) शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली.
नानाजी पुंडलिक राऊत (५५), प्रकाश खुशाल राऊत (४५), युवराज झिंगर डोंगरे (४३, सर्व रा. गणेशपूर) व पुंडलिक मानकर (६५, रा. चिचखेडा) यांचा विद्युत स्पर्शाने मृत्यू झाला.
काही कळलेच नाही
नानाजी राऊत यांचे गावापासून दोन किमी अंतरावर जंगलाला लागून एकर शेत आहे. ते गावातील तिघांना सोबत घेऊन सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास धान पिकाला खत देण्यासाठी शेतात गेले होते. ते शेताच्या सभोवताल झटका मशीनचे तार लावण्याचे काम करत होते. अचानक तारांमध्ये विद्युत प्रवाह संचारला. पाचही जणांना जोरदार धक्का बसला. काहीही कळायच्या आता चौघांचा जागीच मृत्यू झाला.
प्रवाह कुठून आला?
शेतात तार लावत असतानाच त्यात अचानक विद्युत प्रवाह कसा आला, याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती ब्रह्मपुरीचे ठाणेदार प्रमोद बानबले यांनी दिली.