‘तुमने पुकारा और हम चले आए...’;  गुवाहाटीची तरुणी प्रियकराच्या शोधात लातुरात

By राजकुमार जोंधळे | Published: July 11, 2023 05:21 AM2023-07-11T05:21:23+5:302023-07-11T05:22:16+5:30

प्रेमाची ऑनलाइन गोष्ट, ती इतरांच्या मोबाइलवरून संपर्क करीत होती. परंतु, तरुणाशी संवाद झाला नाही. शेवटी थकलेल्या पावलांनी तिने बसस्थानक गाठले.

A girl from Guwahati reached Latur in search of a lover, but was sent back by the police as she did not find him | ‘तुमने पुकारा और हम चले आए...’;  गुवाहाटीची तरुणी प्रियकराच्या शोधात लातुरात

‘तुमने पुकारा और हम चले आए...’;  गुवाहाटीची तरुणी प्रियकराच्या शोधात लातुरात

googlenewsNext

लातूर - सोशल मीडियाच्या जमान्यात बरेच काही ऑनलाइन सुरू आहे. त्यात प्रेमाच्या गोष्टीही आल्याच. अशाच एका कथेतील नायिका गुवाहाटीवरून मजल- दरमजल करीत प्रेमाच्या शोधात लातुरात आली. शेवटी आभासी जगाचा अनुभव घेऊन ती आली तशीच परतली. मात्र, तिच्या गुवाहाटी-लातूर प्रवासाची अन् मुक्कामाची सखी वन स्टॉप सेंटरला नोंद झाली.

अरुंधतीची लातुरातील किशोरचंद्रशी (दोन्ही नाव बदलेले आहे) सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. गप्पागोष्टी झाल्या. प्रेमाचा संवाद झाला. शेवटी ज्याच्याशी ऑनलाइन प्रेम झाले, त्या तरुणाला भेटण्यासाठी तरुणीने गुवाहाटी सोडले. रेल्वेने मुंबईत आली. तेथून लातूर एक्स्प्रेसने ४ जुलै रोजी लातूरही गाठले. प्रवासादरम्यान तिचा मोबाइल मात्र हरवला. मुलाचा मोबाइल क्रमांक तेवढा माहीत होता. पत्ता नाही, इतर कोणीतीही माहिती नाही, आता मुलाला शोधायचे कसे असा तिला प्रश्न पडला. ती इतरांच्या मोबाइलवरून संपर्क करीत होती. परंतु, तरुणाशी संवाद झाला नाही. शेवटी थकलेल्या पावलांनी तिने बसस्थानक गाठले.

कार्यकर्ते अन् पोलिसांची मदत...
बसस्थानकावर रात्री उशिरा एकट्या मुलीला पाहून तिला मदत करण्याच्या भावनेने अनेकजण जमले. सुशिक्षित आणि सुंदर दिसणारी तरुणी गोंधळून गेली होती. सर्वांना उत्तरे देऊन हताश बसली होती. शेवटी सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील आणि सय्यद मुस्तफा यांनी तिला गांधी चौक पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर तिला मध्यरात्री दोन वाजता सखी वन स्टॉप सेंटरला मुक्कामी ठेवण्यात आले. दरम्यान, ती ज्या मुलाच्या शोधात आली, तो तरुणीला भेटला नसल्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी सांगितले.

तरुणीला गुवाहाटीला पाठविले...
सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक वंदना मुंडे म्हणाल्या, पोलिस आणि कार्यकर्त्यांनी आणलेल्या तरुणीस शनिवारी सुखरूप गुवाहाटीला पाठविले आहे. निवाऱ्याची सोय नसलेल्या, अडचणीत असलेल्या महिला, मुलींना सेंटरमध्ये चार-पाच दिवस ठेवले जाऊ शकते. त्या मुलीच्या भावाशी बोलणे झाले असून, तिकीट काढून तिला सुखरूप रवाना केले आहे.

Web Title: A girl from Guwahati reached Latur in search of a lover, but was sent back by the police as she did not find him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.