राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या हाेणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 07:47 AM2022-09-26T07:47:11+5:302022-09-26T07:47:58+5:30
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पाडल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे.
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून, यात न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे. यापूर्वी ७ सप्टेंबरला या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात केवळ १० मिनिटे सुनावणी झाली होती.
कोणत्या याचिकांवर होणार सुनावणी
- शिवसेनेच्या याचिका विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड होण्याआधी शिंदे गटाच्या १६ आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या १६ आमदारांना निलंबित करावे, अशी शिवसेनेची याचिका- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधात शिवसेनेची याचिका.
- विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा करणारी शिवसेनेची याचिका.
- शिंदे गटाच्या याचिका
- उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना निलंबित करण्याच्या बजावलेल्या नोटीसविरोधात शिंदे गटाची याचिका.
- शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शिंदे गटाची याचिका.