कुठल्या क्षणी तुमच्या लाडक्या बहिणीची अब्रू...; महिलेचं थेट CM एकनाथ शिंदेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 09:09 AM2024-08-22T09:09:32+5:302024-08-22T09:14:59+5:30

बदलापूर प्रकरणामुळे राज्यातील गृह खात्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या लाडकी बहिण योजनेवरुनही सरकारला कोंडीत पकडले जात आहे.

A letter from a woman named Aditi Sonar to CM Eknath Shinde regarding the Badlapur case | कुठल्या क्षणी तुमच्या लाडक्या बहिणीची अब्रू...; महिलेचं थेट CM एकनाथ शिंदेंना पत्र

कुठल्या क्षणी तुमच्या लाडक्या बहिणीची अब्रू...; महिलेचं थेट CM एकनाथ शिंदेंना पत्र

मुंबई - बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. २० ऑगस्टला बदलापूर बंदचं आवाहन करण्यात आले होते. या बंदवेळी दगडफेक, तोडफोडीच्या घटना घडल्या. बदलापूर प्रकरणामुळे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरही टीका होऊ लागली आहे. लाडकी बहिण सुरक्षित योजना सरकारने आणावी असा सूर महिलांमध्ये निघत आहे. त्यातच एका महिलेचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रायगडमधील आदिती सोनार असं या महिलेचं नाव असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हे पत्र लिहिलं आहे. काय लिहिलंय या पत्रात वाचा जसंच्या तसं... 

आपण मुख्यमंत्री झाल्यापासून लोकोपयोगी आणि जनहितार्थ नवनवीन योजना आणून सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपाद केलात व पुढे देखील आपल्या हातून असेच कार्य घडत राहील हे आश्वासन आम्हाला दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, 

मागील काही महिन्यांचा इतिहास बघता बेलापूर येथील अक्षता म्हात्रे, उरण येथील यशश्री शिंदे आणि आता बदलापूरच्या शाळेत चिमुकल्या मुलींसोबत घडलेला प्रकार, याकरिता आरोपींना शिक्षा होणे खातीर आपल्याकडे पुरेसा पैसा किंवा निधी उपलब्ध नसेल याचा विचार करता असे नीच कृत्य करणाऱ्या नराधमांसाठी तसेच त्यांना कठोरात कठोर शिक्षण होण्यासाठी सरकार तिजोरीत लाडकी बहीण योजना अंतर्गत वाटलेल्या पैशामुळे किंवा त्यासाठी कोणताही अतिरिक्त झालेल्या खर्चामुळे, सरकारकडून पैशाअभावी कोणतीही दिरंगाई होऊ नये म्हणून आपण ज्या ज्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले आहेत त्या त्या बहिणींच्या खात्यातून एक जबाबदार मोठे भाऊ म्हणून ती रक्कम परत घेण्याची व्यवस्था आपणच करावी.

जेणेकरून यापुढे लाडकी सुरक्षा योजना अंमलात आणण्यासाठी अधिकचा आर्थिक भार महाराष्ट्र सरकार किंवा सर्वसामान्य जनतेच्या तिजोरीवर पडणार नाही. आपल्याला जे काही लिहिले ते आज महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मनात नक्कीच आले असेल. आपण एक मोठे भाऊ म्हणून माझ्यासारख्या तमाम बहिणींची आर्त हाक ऐकाल एवढीच अपेक्षा करते. कारण कुठल्या क्षणी तुमच्या कुठल्या लाडक्या बहिणीची अब्रू चव्हाट्यावर येईल हे आता कोणीच सांगू शकणार नाही

आपली नम्र लाडकी बहिण

आदिती सोनार, पनवेल, रायगड 

दरम्यान, बदलापूर प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीकडून या घटनेचा निषेध नोंदवतानाच सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. येत्या २४ ऑगस्टला महाविकास आघाडीने महिला सुरक्षेचा मुद्दा लावून धरत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 
 

Web Title: A letter from a woman named Aditi Sonar to CM Eknath Shinde regarding the Badlapur case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.