गणेशोत्सवाच्या निमित्ताने अफलातून राजकीय पर्यटन
By अतुल कुलकर्णी | Published: September 4, 2022 01:57 PM2022-09-04T13:57:25+5:302022-09-04T14:05:11+5:30
गणपतीच्या निमित्ताने, आशिष कुलकर्णी यांच्या घरी देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांची झालेली भेट, त्यातून चव्हाण फडणवीसांच्या पक्षात जाणार, या बातम्यांचे वेगवेगळे अर्थ लावत आमच्या चर्चा रंगात आल्या असताना त्या दोन्ही नेत्यांनी आमची भेट झाली, पण त्यात राजकीय काहीच घडले नाही, असे सांगून आमच्या सगळ्या चर्चांवर पाणी टाकले; पण आमचे मनोरंजन झाले हेही नसे थोडके.
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई -
तमाम सर्वपक्षीय नेतेमंडळी, नमस्कार.
गणेशोत्सवाच्या धामधुमीत आपण जी राजकीय धामधूम उडवून दिलीय त्याला तोड नाही. कोण, कोणत्या पक्षात जाणार..? शिवाजी पार्कवर विचारांचे सोने कोण देणार..? इथपासून ते दिल्लीतले नेते कोणाच्या घरी जाणार..? महाराष्ट्रातले नेते कोणाच्या घरी, कोणाला भेटले..? या बातम्यांनी आमची जोरदार करमणूक होत आहे. आपण हा जो काही करमणुकीचा वसा घेतला आहे, त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन..! धन्यवाद देखील..!!
आपण आम्हाला गेली काही वर्षं महागाईची भेट देत आला आहात. त्यासाठीही आपले कौतुक करावे तेवढे थोडे. यावर्षी आपण राजकीय माहोल तयार केल्याने आम्हाला वाढती महागाई विसरणे सोपे झाले. घरात गौरी-गणपतीचा सण साजरा करताना होणारा खर्च पुढच्या महिन्यात कसा भरून काढता येईल, याची चिंता आपल्या मनोरंजक बातम्यांमुळे विसरता आली. क्या बात है...!
गणपतीच्या निमित्ताने, आशिष कुलकर्णी यांच्या घरी देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांची झालेली भेट, त्यातून चव्हाण फडणवीसांच्या पक्षात जाणार, या बातम्यांचे वेगवेगळे अर्थ लावत आमच्या चर्चा रंगात आल्या असताना त्या दोन्ही नेत्यांनी आमची भेट झाली, पण त्यात राजकीय काहीच घडले नाही, असे सांगून आमच्या सगळ्या चर्चांवर पाणी टाकले; पण आमचे मनोरंजन झाले हेही नसे थोडके.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुमच्या राजकीय पर्यटनाला तोड नाही. अमुक तुमचा विरोधक, अमुक तुमच्या बाजूचा... अशा चर्चांना बाजूला सारून लोकांच्या दृष्टीने जे तुमचे विरोधक आहेत, त्यांच्या घरी सगळ्यात आधी बाप्पांचे दर्शन घ्यायला जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा महाराष्ट्रात राजकीय सलोखा, सामंजस्य किती खोलवर रुजलं आहे याची जाणीव होते. पण तुमच्या या वागण्याने गणपती बाप्पा नाराज असल्याचं आमची ही म्हणत होती. रात्री अचानक बोलण्याचा आवाज ऐकू आला आणि तिनं लक्ष देऊन ऐकलं तर बाप्पा त्यांच्या आईकडे म्हणजे पार्वतीला तक्रार करत होते. लोक माझ्या दर्शनाला येतात की ज्यांनी मला घरात आणलं त्यांच्या भेटीला? हे कळेनासे झालं आहे... पांढऱ्या कपड्यातले हे सगळे नेते कोणाच्या दर्शनासाठी येतात हे मी कसे ओळखू..? असा सवाल ते पार्वतीला करत होते. तिकडून पार्वतीमातेनं काय उत्तर दिलं कळालं नाही... पण तुमचं गणेशाच्या नावानं चालू असलेलं राजकीय पर्यटन थेट शंकर-पार्वतीपर्यंत पोहोचलंय..! हे असं जमायला हवं...
आम्हाला हेच जमत नाहीत. आम्ही पण गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र तुमच्यासारखं आमच्या गाठीभेटीला प्रसिद्धी मिळत नाही. चॅनलवाले तर आमच्याकडे फिरकत पण नाहीत... आमच्या शेजारच्या ठमीने बिस्किटांपासून देखावा तयार केला, तर घरातल्या मुंग्या सोडून कोणीही ते पाहायला आलं नाही... चॅनेलवाल्यांना फोन केला तर त्यांनी त्यात काय विशेष, असं म्हणून चक्क फोन कट केला... मग ठमीच्या बाबांनी, आमच्या घरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाचवेळी ठमीचा देखावा पाहायला येणार आहेत, असं सांगितलं तर ठमीच्या बाबाला पोलीस प्रमुखापासून ते सगळ्या राजकीय नेत्यांचे, चॅनेलवाल्यांचे फोन आले...! घरापुढे प्रचंड गर्दी झाली... सगळ्यांना चहा बिस्कीट देता देता नाकी नऊ आले... शेवटी कमी पडले म्हणून देखाव्यातली बिस्किटं काढून द्यावी लागली... एवढं करून बातमी आली नाही ती नाहीच... तुम्हाला हे जे राजकीय कसब साधलं आहे, त्याचा कुठे क्रॅशकोर्स किंवा ट्रेनिंग असतं का...? असलं तर सांगा, म्हणजे पुढच्या वर्षी बाप्पा येईपर्यंत आम्ही देखील ते ट्रेनिंग घेऊन टाकतो... असो... जमलं तर आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या घरी पण पाय लागू द्या...
- आपला, बाबूराव