बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 05:53 PM2024-11-29T17:53:14+5:302024-11-29T17:54:43+5:30

किनारपट्टी भागात थंडीचा प्रभाव राहणार असून, तापमानातही घट होण्याची शक्यता

A low pressure belt in the Bay of Bengal, Light rain forecast in the state | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील किमान तापमानात हळुवारपणे वाढ होत असून, २८ नोव्हेंबरपासून ते १९ डिसेंबरपर्यंत तीन आठवडे राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात थंडी कमी राहील, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्यात गेले चार ते पाच दिवस कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात बाष्पयुक्त वारे वेगाने येत असल्याने २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा थंडी कमी होऊन किमान तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ हाेण्याचा अंदाज आहे. त्याची सुरुवात २३ नोव्हेंबरच्या पहाटेपासून दिसत आहे. पहाटेच्या किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्याची नाेंद करण्यात आली आहे.

उत्तरेकडील शीतलहरींनी आता कोकण किनारपट्टीचा ताबा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकणात बऱ्यापैकी थंडी सुरू झाली आहे. कमाल आणि किमान तापमानही घटल्याने रात्रीही गारठा जाणवू लागला आहे. हा आठवडा किनारपट्टी भागात थंडीचा प्रभाव राहणार असून, तापमानातही घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण आणि दुर्गम भागात थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. कमाल तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. पहाटेही तापमानात कमालीची घट झाल्याने हुडहुडी भरविणारी थंडी पडली आहे. सकाळी १०नंतर तापमानात काही अंशी वाढ झालेली असली तरी गारठा कायम होता.

Web Title: A low pressure belt in the Bay of Bengal, Light rain forecast in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.