मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना टळली, धावत्या बसला लागली आग, विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे १९ प्रवासी वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 08:35 AM2024-02-07T08:35:58+5:302024-02-07T08:42:35+5:30
Bus Fire on Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर एक मोठी बस दुर्घटना टळली आहे. रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या बसने महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाजवळ पेट घेतला. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली.
मुंबई गोवा महामार्गावर एक मोठी बस दुर्घटना टळली आहे. रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या बसने महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाजवळ पेट घेतला. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने बसच्या टायरला आग लागली असताना बसमधून प्रवास करत असलेल्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधून प्रवास करत असलेल्या १९ प्रवाशांसह एकूण २२ जणांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली बस ही रत्नागिरीहून मुंबईकडे येत होती. या बसमधून १९ प्रवासी प्रवास करत होते. तर दोन ड्रायव्हर आणि एक क्लिनर असे मिळून २२ प्रवासी होते. ही बस महाडजवळ सावित्री नदीवर असलेल्या पुलजवळ आली असताना तिने पेट घेतला. रात्री पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बसचा टायर पेटत असत्याचे लक्षात येताच त्याने इतर प्रवाशांना त्याची कल्पना दिली आणि वेळीच सर्व प्रवासी बसमधून बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आर्यन भाटकर असं या प्रसंगावधान दाखवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मुंबईत शिक्षण घेत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमधून सर्व प्रवासी सुदैवाने बचावले. मात्र बसला लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालं आहे.