२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 06:12 AM2024-09-29T06:12:28+5:302024-09-29T06:12:47+5:30
Maharashtra Assembly Election update: दोन दिवस मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाचे पथक मुंबईत होते. यादरम्यान राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी भेटी घेऊन विविध सूचना आणि हरकती नोंदवल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार, ही निवडणूक पुढे ढकलली जाणार का? अशा चर्चा सुरू असतानाच राज्यात २६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल, असे सांगत विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दिले.
दोन दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे, त्यापूर्वी निवडणूक होईल. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे. मात्र, निवडणूक किती टप्प्यात होईल, हे लवकरच सांगू, असे राजीव कुमार यांनी सांगितले.
दोन दिवस मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाचे पथक मुंबईत होते. यादरम्यान राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी भेटी घेऊन विविध सूचना आणि हरकती नोंदवल्या आहेत. यामध्ये राजकीय पक्षांकडून खर्चाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात, तसेच काही वस्तूंचे दर कमी करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. मात्र, खर्चाची मर्यादा ही देशपातळीवर एकच ठरवण्यात आलेली असते, तसेच वस्तूंचे दरही महागाई निर्देशांकानुसारच ठरवलेले असतात. त्यामुळे त्यात कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार गटाच्या मागणीवर नो कमेंट
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुक्त चिन्हातून तुतारी चिन्हाशी साधर्म्य असलेले पिपाणी हे चिन्ह वगळण्याची मागणी शरद पवार गटाने आयोगाकडे केली आहे.
चिन्हाबाबत आदेश आम्ही दिला आहे. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे मी यावर बोलणार नाही, असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.
आदिवासींची नोंदणी
आदिवासींच्या दुर्लक्षित जमातींच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. राज्यात कातकरी, कोलम आणि मारिया गोंड या तीन आदिवासी जमाती आहेत.
यावेळी त्यांची घरोघरी जाऊन १०० टक्के मतदार नोंदणी करण्यात आली आहे. पुण्यातील खडकवासला येथे केवळ २०० कातकरी मतदार असलेले मतदान केंद्र असणार आहे.
शंभरीपार किती मतदार?
एकूण मतदार ९.५९ कोटी
पुरुष ४.९५ कोटी
महिला ४.६४ कोटी
तृतीय पंथी ५९९७
अपंग ६.३२ लाख
८५ वर्षांवरील १२.४८ लाख
१०० वर्षांवरील ४९,०३४
सेवा मतदार १.१६ लाख
पहिल्यांदा (१८ते १९ वर्ष) - १९.४८ लाख
मतदारसंघ स्थिती
एसटी २५
एससी २९
जनरल २३४
१००० मतदारांमध्ये किती महिला
वर्ष प्रमाण
२०१९ ९१४
२०२४ ९३६
यावेळी २२ ने झाली वाढ
राज्यातील मतदान केंद्र
शहरी ४२,५८५
ग्रामीण ५७,६०१
एकूण १ लाख १८६
n५०,०९३ (५० टक्के) केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे देखरेख
nप्रत्येक केंद्रावर सरासरी ९५० मतदार असतील
n२९९ केंद्रावर दिव्यांग कर्मचारी असतील तैनात
n३५० केंद्रे ही नव्याने शासकीय सेवेत आलेले कर्मचारी सांभाळतील
n३८८ केंद्र महिला सांभाळतील.