इवलासा कीटक सांगतो मृत्यूची वेळ; फॉरेन्सिक सायन्ससाठी महत्त्वाचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 08:42 AM2023-02-21T08:42:24+5:302023-02-21T08:42:41+5:30
पुण्यातील झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधकाची माहिती
श्रीकिशन काळे
पुणे - विज्ञान, तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे शोधले जाते. मृत्यूच्या वेळेचा अंदाजही बांधला जातो. मात्र, आता मृत्यूची अचूक वेळ शोधणे अधिक सोपे होणार आहे. तेही ‘ओमोरगस खान्देशी’ या कीटकामुळे. खान्देशमध्ये नुकताच ‘ओमोरगस खान्देशी’ या नव्या कीटकाचा शोध लागला. हा शोध फॉरेन्सिक सायन्ससाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या कीटकाला ‘केराटीन बिटल’ असेही म्हटले जाते. शरीराचे विघटन होत असताना, सुरुवातीच्या अवस्थेत प्रथम तिथे माशा येतात. त्यानंतर तिथे केराटिन फीडर्स येतात. यामुळे फॉरेन्सिक सायन्समध्ये त्यांचे महत्त्व आहे. झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वेस्टर्न रिजनल सेंटरमधील संशोधक अपर्णा सुरेशचंद्र कलावटे यांचे या कीटकाविषयीचे संशोधन न्यूझीलंडच्या झूटॅक्सा या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे वेरनर स्ट्रम्पफेर यांनी सहकार्य केले.
हा कीटक खान्देशमध्ये आढळून आला आहे. त्याचा नमुना १९२२मध्ये ब्रिटिशांनी संकलित केला होता. तो ओळख नसलेल्या किड्यांच्या संग्रहात ठेवलेला होता. अपर्णा कलावटे यांनी त्यावर संशोधन केले.
मातीत लपणारा कीटक
ट्रोगिडे या कीटकांच्या कुटुंबातील हा एक आहे. त्यांना जमिनीखाली लपणारे कीटक असेही म्हटले जाते. कारण यांचा रंग मातीत मिसळणारा म्हणजे विटकरी असतो. त्यामुळे ते शक्यतो लवकर दिसून येत नाहीत. आता ट्रोगिडे या कुटुंबात एकूण १४ प्रजातींचा समावेश झाला आहे.
या बीटलवर खूप संशोधन झालेले नाही. त्यामुळे त्याविषयी वैज्ञानिक माहितीचा अभाव आहे. हे बीटल प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या घरट्याशेजारी आढळून येतात. ब्रिटिशांनी १९२२मध्ये या बीटलचा नमुना जतन करून ठेवला होता. तो आतापर्यंत ओळख नसलेल्या यादीत होता. त्यावर मी अभ्यास करून त्याच्यावरील संशोधन आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रसिद्ध केले. - अपर्णा कलावटे, कीटक संशोधक, पुणे विभागीय कार्यालय, झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाश