"डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर...", देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 06:54 PM2024-08-03T18:54:36+5:302024-08-03T19:49:21+5:30

Devendra Fadnavis : अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

"A person speaks as if his head is broken, on...", Devendra Fadnavis's attack on Uddhav Thackeray! | "डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर...", देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

"डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर...", देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

नागपूर : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटानं चिरडलं जातं, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली. या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नागपुरात शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत तणावात जगत आहेत आणि त्या तणावामुळे ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत, याच्यावर आपण काय उत्तर देणार? एखादा व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करुन अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, याबाबत सीबीआयकडेही पुरावे आहेत. मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे, असे सचिन वाझे यांनी म्हटले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांना विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले, सचिन वाझेंनी जर मला पत्र पाठवलं असेल तर मी ते अद्याप पाहिलेलं नाही. मी पण माध्यमांद्वारे ही बातमी पाहिलेली आहे. मी नागपुरात आहे. त्यामुळे मला याबद्दल काहीही कल्पना नाही. त्यामुळे मी याबद्दल काही पत्र आलं आहे का, त्यात काय लिहिलं आहे, हे पाहून मी त्याबद्दल प्रतिक्रिया देईन. पण जे काही समोर येत आहे, त्याबद्दल योग्य चौकशी आम्ही करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी  देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. गृहमंत्री अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वशंज असल्याचीही टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलं आहे. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

Web Title: "A person speaks as if his head is broken, on...", Devendra Fadnavis's attack on Uddhav Thackeray!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.