दारोदार भटकणं, भीक मागून आयुष्य जगणं; 'ती' मुलगी परिस्थितीशी लढली अन् आज कमाल केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 09:02 AM2024-06-27T09:02:29+5:302024-06-27T09:04:01+5:30

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत विदर्भातील मुलीनं जिद्द उराशी बाळगत समाजासाठी शैक्षणिक दरवाजे उघडले.

A poor girl from Bhandara came up from the society and succeeded in the 10th exam, the story of Ramabai Chavan struggle | दारोदार भटकणं, भीक मागून आयुष्य जगणं; 'ती' मुलगी परिस्थितीशी लढली अन् आज कमाल केली

दारोदार भटकणं, भीक मागून आयुष्य जगणं; 'ती' मुलगी परिस्थितीशी लढली अन् आज कमाल केली

नागपूर - ना डोक्यावर छत, ना राहण्यासाठी घर...जेवणही मिळणं कठीण, कुटुंबाकडे जमीन नाही, कामधंदा नाही. दोन वेळच्या अन्नासाठी दारोदार भटकावं लागायचं. तिचे आई वडील भीक मागून जे काही आणायचे त्यावर तिचं पोट भरायचं. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात. बस्स हेच तिचं जीवन होतं.परंतु जगण्याच्या या संघर्षात तिने एक जिद्द उराशी बाळगली. जिद्द होती स्वत:ला बदलण्याची, कुटुंबाला गरिबीच्या जाळ्यातून बाहेर काढण्याची. ज्या समाजातून ती येते, त्या समाजासाठी एक प्रेरणादायी बनण्याची. ही कहाणी आहे आदिवासी नाथजोडी समाजातून येणारी १६ वर्षीय मुलगी रमाबाई चव्हाण हिची. 

महाराष्ट्राच्या दुष्काग्रस्त विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एका छोट्या वस्तीत राहणाऱ्या रमाबाईनं तिच्या समाजाच्या सर्व परंपरांना छेद देत एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय होता, भीक न मागता शिक्षण घेत नवीन उंची गाठत कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्याचा.मला १० वीची परीक्षा द्यायचीय असं तिने घरच्यांना सांगितले. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती, १० वीच्या शिक्षणासाठी पुस्तके खरेदी करता येतील इतकेही पैसे नव्हते. वर्गात जे काही शिकेल ते केवळ आठवणीत ठेवणे यावरच रमाबाईला अवलंबून राहावं लागायचे. परीक्षेची तारीख जवळ आली, तेव्हा रमाबाईच्या मनात भीती होती. जे शिक्षण तिने कुठलंही पुस्तकं न वाचता घेतले आहे त्याच्या भरवशावर १० वीची परीक्षा कशी द्यायची? तिच्या या भीतीला एका शिक्षकाने दूर करत तिला हिंमत दिली. 

जर तुला तुझ्या समाजासाठी खरेच काही करायचे असेल तर न भीता परीक्षा दे, ही परीक्षा केवळ १० वीची नाही तर तुझं आयुष्य बदलणारी परीक्षा आहे असं शिक्षकाने रमाबाईला सांगितले. रमाबाईनं परीक्षा दिली आणि जेव्हा निकाल आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. रमाबाई तिच्या आदिवासी समुदायात १० वीची परीक्षा पास होणारी पहिलीच मुलगी होती. रमाबाईचं हे यश तिच्या संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा आहे. रमाबाई ही नाथजोगी समाजातून येते जे दारोदार भीक मागून त्यांचे आयुष्य जगतात. हे लोक अत्यंत गरीब असतात, २ वेळच्या जेवणासाठी या लोकांना संघर्ष करावा लागतो. रमाबाई सांगते, माझे आई वडील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा याठिकाणी जेवणासाठी भीक मागायला गेले होते. मागील अनेक पिढ्यापासून आमच्या समाजातील लोकांचे हे वास्तव आहे. त्यामुळेच हा समाज कुठल्याही एका जागेवर स्थिरावला नाही. आमच्याकडे शेती नाही. दुसऱ्यांकडे काम करण्यासाठी कुठलेही शिक्षण नाही. त्यामुळेच हे लोक पूर्णपणे इतरांनी दिलेल्या भीकेवर त्यांचे जीवन जगत असतात. 

रमाबाईच्या या यशात सर्वात मोठं योगदान होतं ते कार्तिक नाथजोगीचं, तिच्या गावात राहणारा कार्तिक मराठी साहित्य आणि पॉलिटिक्स सायन्समध्ये पदवीधर आहे. कार्तिकनेच रमाबाईला शिक्षणाचं महत्त्व समजावलं. या समाजातील मुलींचे लहान वयातच लग्न केली जातात. या समाजाला मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी कार्तिक काम करतो, तिथल्या मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करतो. आमच्या गावातील मुले कायम त्यांच्या आईवडिलांसोबत भीक मागायला जातात. शिक्षणात त्यांना रस नसतो असं त्याने सांगितले. या समाजाला पुढे आणण्यासाठी कार्तिकनं अनेक नेत्यांचे दरवाजे खटखटले.परंतु कुणी मदत केली नाही. मात्र कार्तिकनं प्रत्येकाकडून १०-१० रुपये मागून टीन शेडचे वर्ग बनवले. याच पैशातून त्याने पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणून मुलांना शिक्षण देणे सुरू केले. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांना मदत मिळण्यास सुरुवात झाली. 

Web Title: A poor girl from Bhandara came up from the society and succeeded in the 10th exam, the story of Ramabai Chavan struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.