‘सीईटी’साठी यंदा विक्रमी नोंदणी, किती विद्यार्थी वाढले.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:38 IST2025-03-07T17:38:03+5:302025-03-07T17:38:25+5:30
सांगली : सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)साठी यंदा विक्रमी ८ लाख ९४ हजार ७३४ ...

‘सीईटी’साठी यंदा विक्रमी नोंदणी, किती विद्यार्थी वाढले.. जाणून घ्या
सांगली : सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी)साठी यंदा विक्रमी ८ लाख ९४ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ७ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरलेली असल्याने फक्त तेवढेच अर्ज वैध ठरतील. गतवर्षीच्या तुलनेने यंदा २ लाख ६८ हजार ९६१ इतक्या अर्जांची वाढ झाली आहे.
सीईटीकरिता ३० डिसेंबर २०२४ रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत होती.
सीईटीद्वारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी विज्ञान, फलोत्पादन शास्त्र, फॉरेस्ट्री, फार्मसी, मत्स्य विज्ञान आणि कम्युनिटी सायन्स या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमासाठीची परीक्षा ९ ते १७ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अभियांत्रिकेचे अभ्यासक्रम, ॲग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमांसाठीची परीक्षा १९ ते २७ एप्रिलअखेर होणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढलेला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून नोकरीच्या वाढत्या संधींमुळे दरवर्षी सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही कोर्सेससाठी विशेषत: अभियांत्रिकीच्या काही शाखांचे मेरिट वाढण्याची शक्यता आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, करिअर कौन्सिलर, सांगली