तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:19 AM2024-02-13T07:19:00+5:302024-02-13T07:19:50+5:30

एमएमआरडीएकडून डीपीआरची तयारी

A ring road connecting third Mumbai will be constructed; Chief Minister Shinde's announcement | तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

कल्याण : मुंबई आणि नवी मुंबईच्या मधोमध असलेली शहरे ही तिसरी मुंबई आहे. या तिसऱ्या मुंबईतील पनवेल, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी आणि नवी मुंबईला जोडणारा रिंगरोड प्रकल्प हाती घेतला जाईल. हैदराबाद आणि अहमदाबाद या शहराच्या धर्तीवर अक्सेस कंट्रोल रिंगरोड तयार करण्याकरिता एमएमआरडीएच्या माध्यमातून डीपीआर तयार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. 

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्या नागरिकांना बीएसयूपी योजनेतील घराच्या चाव्यांचे वाटप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सोमवारी अत्रे रंगमंदिरात झाले. याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होते. 

खा. शिंदे यांनी भाषणात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या रिंगरोडची आवश्यकता आहे. या रिंग रोडला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. ती मान्य करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी या रिंगरोडकरिता एमएमआरडीएच्या माध्यमातून डीपीआर तयार केला जाईल, असे जाहीर केले. 

... म्हणूनच काहींना पोटदुखी सुरू झाली

उल्हासनगर : कोरोना काळात डॉक्टर नसताना एक ऑपरेशन केले. त्यानंतर पहिल्या दिवसापासून लोकहिताचे निर्णय घेतले. राज्याचा होणारा सर्वांगीण विकास पाहून काहींना पोटदुखी झाली आहे. ती पोटदुखी दूर करायला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केला असून तेथे उपचार मोफत होत असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे काढले. उल्हासनगर पालिका आणि एका खासगी रुग्णालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दोनशे खाटांच्या या रुग्णालयात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतील सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध होणार आहेत.

कल्याण पूर्वेतील गौरीपाडा येथे उभारलेला सिटी पार्क, कल्याण स्टेशन परिसरातील कै. दिलीप कपोते मल्टी फ्लोअर वाहनतळ, इलेक्ट्रिकल बसगाड्या, आधारवाडी अग्निशमन केंद्र आणि ‘क’ प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण आणि  अमृत दोन प्रकल्पांतर्गत गौरीपाडा येथे ९५ दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्राचे आणि नव्या जलकुंभाचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

डोंबिवलीतही कॅशलेस सुपर स्पेशालिटी रुग्णालय

ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ-बदलापूर, टिटवाळा परिसरात पुण्यातील पीएमपीएलच्या धर्तीवर बस वाहतूक सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रस्तावही लवकर मार्गी लावला जाईल. त्यातून सार्वजनिक वाहतूक मजबूत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. उल्हासनगर महापालिका हद्दीत कॅशलेस सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले आहे. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी पुढाकार घ्यावा. कोविड काळात सुरू केलेल्या जंबो कोविड रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करावे. कल्याण डोंबिवलीतही कॅशलेस सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.

Web Title: A ring road connecting third Mumbai will be constructed; Chief Minister Shinde's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.