पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी विशेष उपक्रम, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा शासनासह पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 09:01 AM2024-01-16T09:01:02+5:302024-01-16T09:01:32+5:30
विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल.
मुंबई : पर्यटनाची पारंपरिक व्याख्या बदलण्याच्या दृष्टीने आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवा उपक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालय राज्य शासनाच्या पर्यटन विभागासह आता अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
विशेष उपक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील अल्प प्रतिसाद असलेल्या पर्यटन स्थळांचा अभ्यास करण्यात येईल. यात कांदळवनांपासून ते ऐतिहासिक स्थळांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी क्षेत्रातील अन्य घटकांसह स्थानिक प्रशासनालाही यात समाविष्ट करण्यात येणार आहे.
पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी अशा पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा, निवास, पर्यटन सुविधा, पर्यटकांचा या भागात होणारा ओघ, प्रवास आणि पर्यटनाची शाश्वतता, जबाबदार पर्यटन, स्थानिक समुदायाचा सहभाग, संवेदना आणि सेवा पुरवठादारांचे प्रशिक्षण यासह विविध पैलूंवर भर देण्यात येणार आहे.
वर्षभर विविध उपक्रमांवर भर
राज्याला सुमारे ७२० किमीचा समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच राज्यभरात उत्कृष्ट प्राचीन मंदिरे, अजिंठा वेरूळ सारखी लेणी, वन्यजीव, थंड हवेची ठिकाणे, धार्मिक स्थळे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थाने आहेत. प्रदेशनिहाय असलेल्या वैशष्ट्यपूर्ण कृषी आणि खाद्य संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत असतात. नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटनाबरोबरच औद्योगिक, आरोग्य, नव्याने शैक्षणिक अन्य क्षेत्रात करत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राकडे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षभर या उपक्रमावर काम केले जाणार आहे. यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध काम करणा-या संस्था व शासन यांमध्ये समन्वयाने महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर नेण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.