Raj Thackeray स्वबळावर लढण्याच्या दिशेने मनसेचं एक पाऊल पुढे, विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:00 PM2024-08-05T13:00:21+5:302024-08-05T13:13:33+5:30
MNS Announced Two Candidates For Vidhan Sabha Election: काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी २०० ते २२५ लढवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, मनसेने स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने मनसेनं आणखी एक पाऊल पुढे टाकत दोन मतदारासंघातील उमेदावारांची नावं जाहीर केली आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत मात्र स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी २०० ते २२५ लढवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, मनसेने स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने मनसेनं आणखी एक पाऊल पुढे टाकत दोन मतदारासंघातील उमेदावारांची नावं जाहीर केली आहेत.
मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी महायुतीच्या नेत्यांच्या राज ठाकरेंसोबत सुरू असलेल्या भेटीगाठींमुळे मनसे ऐनवेळी महायुतीमधून निवडणूक लढवण्याच्या निर्णय घेईल, असा दावा केला जात आहे. मात्र मनसेने आज विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेने पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या दोन उमेदवारांची घोषणा करत मनसेनं स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार असलेल्या शिवडी मतदारसंघावर महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. मात्र मनसेनं येथे बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे समाधान अवताडे हे विद्यमान आमदार आहेत. येथेही मनसेनं दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मनसेने हे दोन उमेदवार जाहीर करत महायुतीला योग्य ते संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे.