छातीत वेदना झाल्या अन् तो खाली कोसळला; सहलीला गेलेल्या ८ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 08:38 IST2025-02-27T08:37:27+5:302025-02-27T08:38:06+5:30
खालापूर पोलीस स्टेशनला या विद्यार्थ्याच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

छातीत वेदना झाल्या अन् तो खाली कोसळला; सहलीला गेलेल्या ८ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
नवी मुंबई - महापालिका शाळेतील विद्यार्थ्याची एक सहल रायगड इथल्या इमॅजिका रिसोर्टला गेली असताना याठिकाणी दुर्दैवी घटना घडली. एक १३ वर्षीय विद्यार्थी छातीत दुखत असल्याने खाली बसला आणि तिथेच कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेवरून मनसेने महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
या घटनेवर खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले की, २५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची एक सहल इमॅजिका इथं आली होती. या सहलीतील आठवीच्या वर्गात शिकणारा १३ वर्षीय मुलगा छातीत दुखत असल्याचं सांगून तिथे कोसळला. यानंतर त्याला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे खालापूर पोलीस स्टेशनला या विद्यार्थ्याच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले.
मनसेनं महापालिकेला धरलं जबाबदार
इमॅजिका येथे सहलीला गेलेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी महापालिका शिक्षण उपायुक्त आणि शिक्षणाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मनसेने केला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना सहल त्याठिकाणी नेण्यामागे ठेकेदाराचे व्यावसायिक हित आहे. अधिकारी, ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळे विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
महापालिका शाळेतील २२०० विद्यार्थ्यांची सहल खालापूर इथल्या इमॅजिका पार्कमध्ये गेली होती. त्यामध्ये आठवीचा विद्यार्थी आयुष्य सिंग याची प्रकृती अचानक खालवल्याने त्याचा मृत्यू झाला. आयुष्य सिंगच्या छातीत दुखत असल्याचं सांगण्यात येते. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याआधीच तो मयत झाला.