धनुष्यबाणाविना उपसलेली तलवार, सर्वार्थाने पॉवरफुल होती पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:21 AM2022-10-10T10:21:06+5:302022-10-10T10:22:14+5:30

पोटनिवडणुकांनी शिवसेनेला उभारी दिली. ताकद दिली होती. शिवसेना वाढली, ती पोटनिवडणुकीच्या माध्यमातूनच..!

A sword wielded without a bow and arrow, Shivsena was powerful after all but now... by Election | धनुष्यबाणाविना उपसलेली तलवार, सर्वार्थाने पॉवरफुल होती पण आता...

धनुष्यबाणाविना उपसलेली तलवार, सर्वार्थाने पॉवरफुल होती पण आता...

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 
शिवसेनेच्या हातातून धनुष्यही गेले आणि नावही..! अंधेरी विधानसभेची पाेटनिवडणूक तोंडावर आलेली असताना हा बसलेला झटका अपेक्षित असला तरी मोठा आहे. आजवरचा इतिहास पाहिला तर शिवसेनेला कायम संघर्ष करावा लागला आहे. मात्र, त्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आजची राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी केलेले बंड हे त्यांच्या पुरते होते. त्यावेळी शिवसेना सर्वार्थाने पॉवरफुल होती. एकनाथ शिंदे यांचे बंड शिवसेनेला मुळापासून हलवून गेले आहे. चिन्ह कोणाकडे राहणार, हा प्रश्नही निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपुरता निकाली काढला आहे. खऱ्या अर्थाने, आता ठाकरे गटाला शून्यातून सगळी उभारणी करावी लागणार आहे. 

याआधीच्या पोटनिवडणुकीचा इतिहास वेगळा होता. त्या पोटनिवडणुकांनी शिवसेनेला उभारी दिली. ताकद दिली होती. शिवसेना वाढली, ती पोटनिवडणुकीच्या माध्यमातूनच..! १९७० ला कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांच्या खुनानंतर लालबाग- परळ विधानसभेची पोटनिवडणूक झाली. तिथे वामनराव महाडिक पहिल्यांदा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर जो विजयी मेळावा झाला तो भूतो न भविष्यती असा होता. प्रचंड संख्येने मुंबईकर आणि शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यातून शिवसेनेची मुंबईत वाढ होण्याला मोठी मदत झाली होती. त्यामुळेच १९८५ ला शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत आली.
पुढे तत्कालीन काँग्रेसचे आमदार हंस भुग्रा यांच्या निधनामुळे १९८७ ला विलेपार्ले मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत जनता पार्टीच्या वतीने प्राणलाल व्होरा, काँग्रेसच्या वतीने प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेच्या वतीने रमेश प्रभू मैदानात उतरले होते. ही तिरंगी लढत होती. त्यात रमेश प्रभू विजयी झाले. १९८७ ची ही पोटनिवडणूक सर्वार्थाने गाजली ती बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळे. जनता पार्टी विरोधात असताना बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केला. निवडणूक रमेश प्रभू जिंकले. प्रभाकर कुंटे दोन नंबरवर होते. निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात आणला गेला म्हणून, प्रभाकर कुंटे यांनी त्या निकालाला न्यायालयात आव्हान दिले होते. हिंदुत्वाचा मुद्दा निवडणुकीत घेतला म्हणून न्यायालयात गेलेली ही पहिली निवडणूक होती.

 मात्र, प्रभाकर कुंटे यांना त्यात पराभव पत्करावा लागला आणि शिवसेनेचे हिंदुत्व पुन्हा प्रकर्षाने समोर आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या उघड पुरस्कारापासून भाजप स्वतःला वेगळी ठेवू शकली नाही. नंतरच्या दोन वर्षातच ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे...’ या घोषणा सुरू झाल्या.
त्यानंतरच शिवसेना विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वेगाने वाढली. आता पुन्हा एकदा त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजची परिस्थिती वेगळी आहे. समोर अंधेरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. १९८७ ला विलेपार्लेची पोटनिवडणूक होती. आता एक स्टेशन पुढे, अंधेरीची पोटनिवडणूक आहे. अंधेरी- विलेपार्ले या दोन स्टेशनमध्ये अंतर कमी असले तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यात खूप अंतर पडले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कट्टरपणे हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता त्याच्या नेमकी उलट भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. तर हिंदुत्वाचा; आडून पुरस्कार करणारी भाजप ठामपणे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे आली आहे. त्याला साथ देण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी केले. बदलत्या काळाला कवेत घेत, उद्धव ठाकरे यांनी उदारमतवादाचा मार्ग स्वीकारला. नेमके त्यालाच आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या हिंदुत्वासोबत जात उद्धव ठाकरे यांना उघडे पाडण्याचे काम केले आहे. 

आता खरी परीक्षा उद्धव ठाकरे यांची आहे. ज्या भाजपकडे स्वतःचे चिन्ह आहे ती भाजप पोटनिवडणूक लढवणार आहे. ज्यांनी हिंदुत्वाच्या नारा देत बंड केले ते एकनाथ शिंदे या निवडणुकीत कुठेही नाहीत, आणि ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे ना धनुष्य आहे ना बाण..! अशा परिस्थितीत त्यांच्याकडे फक्त बाळासाहेबांचे नाव आहे; पण ते तर एकनाथ शिंदे यांच्याकडेही आहे. अशा परिस्थितीत ठाकरे यांना शून्यातून स्वतःला व पक्षाला उभे करायचे आहे. सोबत नवे चिन्हही घ्यायचे आहे. एकदा चिन्ह गोठवले गेले की ते पुन्हा परत मिळाले, अशी एकही घटना भारताच्या राजकीय इतिहासात नाही. उद्धव ठाकरेंकडे आता ना धनुष्यबाण राहिला, ना शिवसेनेचे नाव. त्यांना आता धनुष्यबाणाविना तलवार उपसावी लागणार आहे. थोडक्यात, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर हे ‘पुनश्च हरी ओम’ आहे...!

Web Title: A sword wielded without a bow and arrow, Shivsena was powerful after all but now... by Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.