जालन्यात 'थ्री इडियट' स्टाईलनं दिला बाळाला जन्म; व्हॅक्यूम प्रसुतीचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 10:16 AM2022-09-11T10:16:49+5:302022-09-11T10:18:30+5:30
जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील २१ वर्षाच्या गोदा गुडेकर शुक्रवारी सकाळी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं
जालना - शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात थ्री ईडीयट चित्रपटातील दृश्यासारखी व्हॅक्यूम प्रसूती यशस्वी करण्यात आली आहे. तब्बल १७ डॉक्टरांनी केलेल्या या प्रसूतीला यश आलं आहे. ही प्रसूती पूर्णपणे यशस्वी झाल्यानं महिलेसह बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील २१ वर्षाच्या गोदा गुडेकर शुक्रवारी सकाळी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे. हा आजार असल्यानं गोदा यांचा पाठीचा मणका हा वाकडा आहे. शिवाय गर्भाशयात बाळाला आवश्यक तेवढी जागा मिळाली नाही. त्यामुळे अशा रुग्णांची प्रसूती करणं डॉक्टरांसमोर मोठं आव्हान असतं. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या शरीरात प्लेटलेटही फक्त ७८ हजार इतक्याच असल्यानं प्रसूती नॉर्मल आणि सीझर करणं देखील डॉक्टरांना कठीण होतं.
याशिवाय भूल देण्यानेही गर्भवतीच्या जीवाला धोका होता. त्यामुळे प्रसूती करण्याबाबत चिंतेचे वातावरण पसरलं होतं. त्यामुळे डॉक्टरांना या सर्व प्रक्रियेसाठी २ तास लागले. अखेर १७ तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने मेहनतीने व्हॅक्यूम पद्धतीने प्रसूती केल्यानं महिलेसह नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. प्रसूती झालेल्या महिलेसह बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.